आप’ने नागपूरच्या या मंत्र्यांसाठी केला सद्बुद्धी यज्ञ

‘आप’ने नागपूरच्या या मंत्र्यांसाठी केला सद्बुद्धीसाठी यज्ञ
-संविधान चौकात आंदोलन

प्रतिनिधी
नागपूर : वेदांता-फोक्सकाॅननंतर टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातने पळविला. राज्यातील अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला जात आहे. हे लक्षात घेता आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी यावी, यासाठी आम आदमी पार्टीने रविवारला ( 30 ऑक्टोबर) सकाळी संविधान चौकात यज्ञ आंदोलन करण्यात आले.

मिहानमधील टाटा एअरबस प्रोजेक्ट गुजरातमध्ये नेण्यात आला आहे. मिहानमधील प्रोजेक्ट विदर्भात असायला पाहिजे होता. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी यावी, म्हणून आम आदमी पार्टीने यज्ञ केला. नागपुरातील रोजगार गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे नागपुरातील सुशिक्षित युवकांवर भीक मागायची वेळ आली आहे, अशी टीका करीत आम आदमी पार्टीने भीक मांगो आंदोलनदेखील केले. आपचे विदर्भ माध्यम प्रमुख भूषण ढाकुलकर यांनी सांगितले की, एका पाठोपाठ एक प्रकल्प राज्याबाहेर चालले. बेरोजगारांमध्ये नाराजी आहे. यातील काही प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये होणार होते. त्यामुळे येथे रोजगार निर्मिती झाली असती. स्थानिकांना रोजगार देण्यासाठी मिळाला असता. परंतु प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे ही संधी हिरावल्या गेली आहे. म्हणून भीकमागो आंदोलन करण्यात आले आहे.

-शहरात दोन दिवसापासून आंदोलन

विदर्भात होणारे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याने सध्या रोष व्यक्त केला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची आंदोलने सुरू आहे. नागपुरात युवक काँग्रेसने आक्रमक हाेत शनिवारी मुख्यमंत्री निवास असलेल्या रामगिरीचा फलक बदलवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी ताे प्रयत्न हाणून पाडला. नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसांसोबतही धक्काबुक्कीची घटना घडली.

-ठाकरे गटाचा आंदोलनाचा पावित्रा

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी उद्या सोमवार ३१ ऑक्टोबर रोजी आंदोलन जाहीर केले आहे. मात्र स्थळ सांगितलेले नाही. याशिवाय, काँग्रेस विचार जनजागृती अभियानातर्फे व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. आता शिवसेना ठाकरे गटही आंदोलनाच्या तयारीत आहे.