होय ! मनसे-भाजप-शिंदे सेनेची युती होणार

होय ! मनसे-भाजप-शिंदे सेनेची युती होणार
– या आमदारांनी केला दावा
प्रतिनिधी
कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीकता गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. यावरुन मनसे-भाजप-शिंदे गटाच्या युतीच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मात्र स्पष्टपणे ही युती होण्यासंदर्भात समर्थन केले आहे.

मनसेने भविष्यात शिंदे आणि फडणवीसांसोबत युती करायला हरकत नाही, असे मोठे वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा नाही का? राज ठाकरे यांचे आदेश आले तर नक्कीच युती करू, असे राजू पाटील म्हणाले आहेत. आमदार राजू पाटील हे अंबरनाथमध्ये मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांना राज ठाकरे यांची शिंदे-फडणवीस यांच्याशी जवळीक वाढत असल्याबाबत विचारले. आमच्यासारख्या बाहेरून पाठिंबा असलेल्या पक्षांच्या मागण्या जर हे सरकार मान्य करत असेल, सकारात्मक प्रतिसाद देत असेल, तर जवळ येण्यास हरकत नाही, असे राजू पाटील म्हणाले.

-शिंदे आणि फडणवीस सरकारकडून सकारात्मक पावले
तसेच पूर्वीच्या सरकारमध्ये कुणी दखलच घेत नव्हते. याशिवाय, एखादी मागणी केली की ती कशी पूर्ण होणार नाही, याकडे लक्ष दिले जायचे, असा आरोप त्यांनी केला. तर शिंदे आणि फडणवीस सरकारकडून मात्र आमच्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक पावले पडताना दिसत आहे.

-राज ठाकरे यांनी आदेश दिले तर…
भविष्यात मनसेची या दोन पक्षांशी युती होऊ शकेल का? असे त्यांना विचारले असता, आम्ही स्वबळावर लढणार आहोत हे राज ठाकरे यांनी आधीच सांगितले आहे. मात्र, तरीही भविष्यात तशी काही परिस्थिती निर्माण झालीच, तर एकत्र यायला हरकत नाही, असे राजू पाटील म्हणाले. तसेच सध्या ज्या युत्या आणि आघाड्या होताहेत, त्यावर कुणाकडेही काहीही बोलायला राहिले नाही. त्यामुळे आम्ही आमचा पक्ष वाढवायचा नाही का? असे म्हणत राज ठाकरे यांनी जर आदेश दिले, तर आम्ही एकत्र यायला तयार आहोत आणि त्यावर कुणाला काही हरकत नसावी, असे देखील राजू पाटील यांनी म्हटले आहे.