नागपूर जि.प. सत्ता पक्ष काँग्रेस घेणार नाराजांचा ‘क्लास’

नागपूर जि.प. सत्ता पक्ष काँग्रेस घेणार नाराजांचा ‘क्लास’
-थोड्याच वेळात अध्यक्ष बंगल्यावर बैठक
प्रतिनिधी
नागपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सत्तापक्षाची ही दुसरी बैठक गुरुवारी(१३ ऑक्टोबर) अध्यक्षांचे निवासस्थान येथे आयोजित आहे. ती बैठक काही वेळातच सुरु होण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्टी नाराजांचा या बैठकीत क्लास घेणार असल्याची आहे.

याशिवाय, व्हीपची प्रक्रिया आजच जारी होण्याची शक्यता आहे. यासोबतच नाराजांना वठणीवर आणण्यासाठी त्यांचे प्रबोधन तसेच सक्तीचे निर्देश देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या कामासाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ सदस्यांची फळी तयार केल्याचे सांगण्यात येते़. त्यामुळे काँग्रेसचे ‘मिशन प्रेसिडंट’ ही निवड प्रक्रिया चांगलीच रंजक होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होऊ घातली. पुढील सव्वादोन वर्षासाठी अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी राखीव आहे. विद्यमान सत्तापक्ष काँग्रेसकडे या प्रवर्गातून सात दावेदार आहेत.

अद्यापही अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे ठरलेले नाही. यापूर्वीही काँग्रेस नेत्यांच्या बैठका झाल्यात. आता पुन्हा आज गुरुवारी काँग्रेस नेते व सदस्यांची बैठक होत आहे. काँग्रेसमधील नाराजी टाळण्यासाठी या बैठकीनंतरच सर्व काँग्रेस सदस्य हे सुरक्षितस्थळी सहलीसाठी रवाना करण्यात येईल. सकाळी ११ वाजता सिव्हिल लाइन्सस्थित जि.प. अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडेल़ या बैठकीला माजी मंत्री आमदार सुनील केदार, माजी मंत्री तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना गावंडे, सुरेश भोयर आदींची उपस्थिती राहील. यासोबतच सर्व जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. या बैठकीमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसंदर्भात चर्चा होणार आहे. इतर सदस्यांची नाराजी टाळण्याचा प्रयत्न राहील. अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या नावावर निवडणुकीच्या दिवशी अर्थात वेळेवरच अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. सत्तापक्ष काँग्रेसकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातून अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेत्या शांता कुमरे, मुक्ता कोकड्डे, देवानंद कोहळे, प्रीतम कवरे, पिंकी कौरती, नीलिमा उईके आणि शंकर डडमल हे दावेदार आहे.

– पद व पैशांच्या आमिषांना येणार उधाण
मागील काही दिवसांपासून भाजपातील एक गट काँग्रेसमधील सदस्यांना फोन करून नवीन समीकरणासाठी आग्रह करीत आहे. त्यासाठी पद व पैशांची आमीष देण्यात येत आहे. यापूर्वी, काही बैठका झाल्यात. सदस्यांच्या आकडेवारीचे गणित जुळविण्यात आल्याची माहिती सूत्रांची आहे. देवानंद कोहळे व एका महिला सदस्याचा जातवैधता प्रमाणपत्राची अडचण असल्याची माहिती आहे. डडमल हे एका प्रकरणात आरोपी असल्याची माहिती आहे. विरोधी पक्ष भाजपाकडेही एक महिला सदस्य आहे़ वेळेवर भाजपा हा संपूर्ण डाव उलटवेल, असा दावा भाजपा नेत्यांचा आहे.