स्थानिक स्वराज्य संस्थामधील पराभव : थेट मुख्यमंत्र्यावर झाले आरोप !

स्थानिक स्वराज्य संस्थामधील पराभव : थेट मुख्यमंत्र्यावर झाले आरोप !

-विधानसभेच्या निवडणुकांआधी वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालावे

प्रतिनिधी
राजस्थान : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत, भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. यामुळे भाजपा नेतृत्त्वातील काही घटक संघटनात्मक आणि राजकीय रणनीती पडताळून पाहण्याची गरज असल्याचे बोलून दाखवत आहेत. काही वर्षांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांआधी पक्षाने यात लक्ष घालण्याची आवश्यकता भाजपा नेत्यांकडून बोलून दाखवली जात आहे.

विरोधात असणाऱ्या काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत, ३७ पैकी २३ जिल्हा परिषदा आणि भाजपापेक्षा ७०% अधिक पंचायत समितीच्या जागा जिंकल्या आहेत. यातून ग्रामीण भागांतील मानसिकतेत मोठा बदल झाल्याचे दिसून आले. मात्र, सप्टेंबरमधील पालिकेच्या निवडणुकांत, सत्ताधारी भाजपाने आपली पकड कायम राखली होती.

केंद्रातील नेत्यांसह भाजपाच्या अनेक नेत्यांचे असे मानणे आहे की, पक्षाने राज्यांतील संघटनात्मक कमतरतांचा आढावा घेण्यासाठी हस्तक्षेप करावयास हवा आणि याचे दूरगामी परिणाम होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. हे करणे जरूरीचे आहे, कारण येणाऱ्या वर्षांत काही प्रमुख राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि उत्तर प्रदेश हे त्यातले सर्वांत मोठे उदाहरण आहे.

एका वरिष्ठ नेत्याने, “ज्यावेळी पक्ष महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांची तयारी करत आहे, त्याच काळात हा निकाल आला आहे; अशावेळी निकालांमधून मिळालेला संदेश हलक्यात घेऊन अथवा दुर्लक्षित करून चालणार नसल्याचे” सांगितले.

“भाजपा हा केडर आधारित पक्ष आहे आणि अनेक राज्यांत पक्षाला भेडसावणारा सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे केडरमधील नाराजी होय”, असे एका नेत्याने सांगितले.

मागील काही महिन्यांत भाजपाने जनसंपर्क उपक्रमांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते आहे. पक्षाने खासदार, आमदार आणि मंत्र्यांना एक्स आणि इन्स्टाग्रामवरील पोस्टस्च्या आकड्यांसह, त्यांच्या समाजमाध्यमांवरील उपक्रमांचा अहवाल जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपाचे एक नेते म्हणतात की, “अशा उपक्रमांवर फार वेळ आणि ऊर्जा खर्च होते. यातून प्रत्यक्ष जनसंपर्क किती होतोय याचे आकलन आजही करण्यात आलेले नाही. शीर्षस्थ नेतृत्वाद्वारे केल्या जाणाऱ्या नियुक्त्या आता कोणत्याही चर्चेशिवाय होत आहेत.”

एका नेत्याने हे दाखवून दिले की, जानेवारी २००३ नंतर भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झालेली नाही. पक्षाच्या संविधानात नमूद केल्याप्रमाणे, दर तीन महिन्यांनी ही बैठक होणे अपेक्षित आहे. यापूर्वी ही बैठक किमान वर्षाला एक वेळा होत असे. पक्षाचे अध्यक्ष नितीन नबीन आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीतही प्रचंड दिरंगाई झाल्याचे पक्षातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

राजस्थानातील अनेक नेत्यांसह भाजपामधील इतर नेत्यांनी या पराभवामागील कारणे दिली आहेत. यात नोकरशाहीचा अवाजवी प्रभाव, दुबळे राज्य नेतृत्व आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना पक्षातील काही वरिष्ठांनी न पुरवलेले सहाय्य अशी काही कारणे सांगितली जात आहेत. काहींनी युजीसी नियमांमुळे उच्चवर्णीय मतदारांमध्ये असंतोष असल्याचा आरोप केला आहे. पक्षातील एक वरिष्ठ सदस्य म्हणाले की, “हा निकाल म्हणजे काँग्रेसप्रती प्रेम नसून, भाजपावर असणारा असंतोष आहे.”

राजस्थानातील भाजपा नेत्यांच्या मते, सत्तेतील पक्षासाठी हा पराभव अत्यंत लाजिरवाणा आहे. योजना, प्रकल्प आणि शासकीय उपक्रम राबवणारा सत्तेतील पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत इतकी वाईट कामगिरी करत नाही. ते म्हणतात की, सत्ता म्हणजे पैसे (फंड्स) आणि हाच विजयाचा फॉर्म्युला असतो; परंतु यावेळी तसे झाले नाही.

या लाजिरवाण्या पराभवानंतर पक्षांतर्गत टीकेला सुरुवात झाली असून, काही नेत्यांनी राज्यातील नेतृत्वालाच जबाबदार ठरवले आहे. एका पक्षनेत्याने सांगितले की, “प्रशासकीय कारभारातील अपयश ही मुख्य अडचण आहे. मुख्यमंत्री मोठे निर्णय घेताना सहकारी मंत्र्यांचा सल्ला घेत नाहीत आणि यामुळे या सरकारात ताळमेळ नसल्याचे दिसून येते. राज्यात सक्षम राजकीय नेतृत्त्व नसल्याने नोकरशाही त्यांची मनमानी करत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी युजीसी नियमांचा हवाला देत पराभवासाठी केंद्राला दोषी ठरवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.”