या मतदारसंघात इनकमिंग : काँग्रेसचा जनाधार वाढतोय
-मयूरसिंह पाटील यांनी केला काँग्रेस प्रवेश
प्रतिनिधी
पुणे : राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांपासून मैत्री झाल्याने इंदापूर विधानसभा मतदार संघातील भाजपचा प्रभाव कमी झाला असताना आता काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. या तालुक्यातील भाजपचे नेते प्रवीण माने यांचे साथीदार आणि हर्षवर्धन पाटील यांचे चुलतबंधू मयूरसिंह पाटील यांनी काँग्रेसने प्रवेश केला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना घरातूनच आव्हान उभे राहिले आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी राजकीय जुळणी करत कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून पुन्हा अध्यक्ष झाले आहेत. मात्र, पाटील यांच्यासमोर आता घरातूनच आव्हान उभे राहिले आहे. आतापर्यंत भाजपमध्ये असलेले त्यांचे चुलतबंधू मयूरसिंह पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या इंदापूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने शिरकाव केला आहे.
हर्षवर्धन पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी हातमिळवणी केली. भरणे आणि पाटील यांच्यात सख्य झाल्याने एकेकाळी पाटील यांच्याबरोबर असलेले भाजपचे नेते प्रवीण माने यांनी त्यांची साथ सोडली. माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर हे नगरपालिकेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर होते. पाटील आणि भरणे हे एकत्र आल्याने गारटकर हे भाजपमध्ये गेले. त्यामुळे आता माने आणि गारटकर हे एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी आता मित्र झाले आहेत. त्यांच्या बरोबरीला मयूरसिंह पाटील हे होते. मयूरसिंह पाटील हे भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेले आहेत.
मयूरसिंह पाटील हे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, दुधगंगा तालुका दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष आहेत. ते भाजपमध्ये होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे ते चुलतबंधू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने त्यांना इंदापूर तालुक्याचे अध्यक्षपदही दिले आहे.
दिवंगत खासदार शंकरराव बाजीराव पाटील हे त्यांचे चुलते आहेत. शंकरराव बाजीराव पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सहावेळा आमदार आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. त्यामुळे काँग्रेसचा वारसा असलेले मयूरसिंह पाटील आहेत.
मयूरसिंह पाटील यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना मदत न करता तत्कालीन अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला. माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मयूरसिंह पाटील हेदेखील भाजपमध्ये गेले. आता ते काँग्रेसमध्ये परतले आहेत.
इंदापूर एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला
इंदापूर विधानसभा मतदार संघ हा बारामती लोकसभा मतदार संघात आहे. इंदापूर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असे. शंकरराव बाजीराव पाटील हे विधानसभेत काँग्रेसच्या तिकिटावर सलग सहावेळा निवडून आले. १९८० मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर इंदापूरमधून काँग्रेसचे राजेंद्र घोलप निवडून आले होते.
१९८५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचेच गणपतराव पाटील निवडून आले. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीतही शंकरराव बाजीराव पाटील हे पुन्हा खासदार झाले. मात्र, १९९५ नंतरच्या विधानसभा निवडणुकीनंतर हर्षवर्धन पाटील हे सलग तीनवेळा अपक्ष म्हणून निवडून आले. २००९ च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले.
२०१४ पासून हा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यातून गेला आहे. सलग तीन निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे निवडून आले आहेत. आता मयूरसिंह पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेसने पुन्हा इंदापूरमध्ये शिरकाव केला आहे.


