शिवसेनेचा पूर्व विदर्भावर डोळा : हे दिग्गज लागणार गळाला!

शिवसेनेचा पूर्व विदर्भावर डोळा : हे दिग्गज लागणार गळाला!

-संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी मोठे पाऊल

प्रतिनिधी
नागपूर : भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भात आता एकनाथ शिंदेंची शिवसेनाही आपली संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना ही सत्ताधारी महायुतीचा भाग असूनही विदर्भात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यावर भर देत आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांना भाजपाची विचारधारा मान्य असली, तरी पक्षाच्या मोठ्या संघटनात्मक रचनेत स्वतःला मर्यादित संधी मिळत असल्याचे या कार्यकर्त्यांना वाटते, त्यामुळे ते शिवसेनेकडेच राजकीय संधी म्हणून पाहतात. नागपुरातील शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने उदाहरण देत सांगितले की, “तुम्ही खरेदीसाठी बाहेर पडला असाल, तर दहा जणांची रांग असलेल्या बिलिंग काउंटरवर जाल की २५ जणांची रांग असलेल्या काउंटरवर?”

विदर्भात संघटनात्मक विस्तारासाठी शिवसेनेने काही ठोस पावलेही उचलली आहेत. नोव्हेंबरमध्ये संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी सहा स्वतंत्र शहरप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातून संघटनेची जबाबदारी विकेंद्रित करण्याचा प्रयत्न दिसत आहे.

एप्रिलमध्ये माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना पक्षात घेणे, ही देखील शिवसेनेची जमेची बाजू ठरली आहे. कडू यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला विदर्भात केवळ एक माजी मंत्री मिळाला नाही, तर अमरावती परिसरातील त्यांचा आधीपासून असलेला जनाधारही पक्षाशी जोडता आला आहे. शेतकरी प्रश्न आणि ग्रामीण भागातील समस्यांवर काम करत कडू यांनी आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नोव्हेंबरमध्ये विदर्भाचा व्यापक दौरा केला.

नागपुरातही शिवसेना राजकीय ताकद आजमावत असल्याचे दिसून येते. दक्षिण नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक संघटनांमधील सुमारे २५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा आयोजकांचा दावा आहे. यामध्ये काँग्रेस, भाजपा, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.

विदर्भात भाजपाची संघटनात्मक ताकद मजबूत असल्याने पक्षात महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागते. याउलट, आताच संघटनात्मक जाळे निर्माण करु पाहणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेत मतदारसंघ, जिल्हा आणि विभागीय पातळीवर जबाबदारी मिळवण्याच्या संधी आहेत. त्यामुळे तरुण कार्यकर्ते केवळ विचारधारेकडे आकर्षित न होता, राजकीय नेतृत्वाची संधी मिळवण्यासाठी धडपडत आहेत.

नागपुरातील शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मते, मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची वाढलेली सार्वजनिक उपस्थिती, लोकांशी थेट संपर्क आणि लाडकी बहीण योजनेसारख्या कल्याणकारी उपक्रमांमुळे पक्षाची लोकप्रियता वाढली आहे.

मात्र, विदर्भाच्या पूर्व भागात भाजपाचे वर्चस्व असल्याने अनेकदा राजकीय महत्त्वाकांक्षा आणि संघटनात्मक मागण्यांबाबत शिवसेनेला तडजोड करावी लागली आहे, असे या नेत्याने सांगितले. पूर्व विदर्भाकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याची त्यांची भावना आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी शिवसेनेने आता नागपूर, अमरावती आणि गडचिरोलीवर लक्ष केंद्रित केले आहे. आमदार उदय सामंत आणि योगेश कदम यांच्यासारखे वरिष्ठ नेते या भागात दौरे आणि संघटनात्मक बैठका घेत आहेत.