दोन आमदारांचा भाजपा प्रवेश ठरला; काही वेळात निर्णय मागे
-पक्षांतरबंदीने अपात्र ठरविण्याची मागणी
प्रतिनिधी
बिहार : बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या दोन अपक्ष उमेदवारांनी सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेश केल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून, विरोधकांनी यावरून भाजपाला कोंडीत पकडले आहे. या दोन्ही सदस्यांनी पक्षांतर केल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी त्यांना पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींनुसार अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. या संदर्भात सोमवारी जनसुराज पक्षाच्या (JSP) एका शिष्टमंडळाने बिहार विधान परिषदेचे सभापती रामबचन राय यांची भेट घेतली. बन्सीधर ब्रजवासी आणि राहुल राज या दोन्ही सदस्यांना तातडीने अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
ब्रजवासी यांनी तिरहुत पदवीधर मतदारसंघातून, तर राहुल राज यांनी सारण शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवला होता. बिहारमध्ये विधानपरिषदेच्या आठ जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने (राजद) प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडने आणि प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने प्रत्येकी एक जागा मिळवली. उर्वरित दोन जागांवर अपक्ष उमेदवार बन्सीधर ब्रजवासी आणि राहुल राज यांनी विजय मिळवला.
शनिवारी संध्याकाळी बिहार भाजपाने आपल्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावरून एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यामध्ये बन्सीधर ब्रजवासी आणि राहुल राज यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केल्याचे जाहीर करण्यात आले. या दोन्ही अपक्ष सदस्यांनीही आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. भाजपाचे भगवे उपरणे परिधान केलेले आणि पक्षाचे सदस्यत्व घेतल्याच्या पावत्या हातात धरलेले त्यांचे फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. मात्र, या प्रकरणावरून राजद, काँग्रेस आणि जनसुराज पक्षाने भाजपाला घेरले. ब्रजवासी आणि राहुल राज यांचा भाजपा प्रवेश पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत येत असल्याचा दावा विरोधकांनी केला. तसेच या दोघांनाही अपात्र ठरवण्याची मागणी केली.
–भाजपाने केला संविधानाचा अवमान
राजदचे कार्याध्यक्ष आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत दोन्ही अपक्ष विधानपरिषद सदस्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. तसेच, भाजपा संविधानाची थट्टा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राजदचे खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मनोज कुमार झा म्हणाले की, पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखादा अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करत असेल, तर त्याला सभागृहाचे सदस्यत्व गमवावे लागते.
जनसुराज पक्ष न्यायालयात जाण्याच्या तयारीत
जनसुराज पक्षाचे प्रवक्ते कुमार सौरव यांनीही या प्रकरणावरून भाजपावर टीका केली. ब्रजवासी आणि राहुल राज यांनी भाजपामध्ये प्रवेश करताना घेतलेल्या सदस्यत्वाच्या पावत्यांवरील क्रमांकांचा त्यांनी संदर्भ दिला. ते म्हणाले, की हा संविधानातील तरतुदींचा उघडपणे भंग आहे. गरज पडल्यास दोन्ही सदस्यांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी आम्ही न्यायालयातही धाव घेऊ.
जनसुराज पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार किशोर कुमार मुन्ना यांनी विधानपरिषदेचे सभापती रामबचन राय यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. याबाबत ते म्हणाले, की निवडणूक जिंकल्यानंतर अवघ्या ७२ तासांच्या आत या दोन्ही अपक्ष विधानपरिषद सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती आम्ही सभापतींना दिली आहे. त्यासंदर्भातील पुरावेही सादर करण्यात आले आहेत. या दोन्ही सदस्यांनी आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे उघडपणे मान्य केले होते. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे. बिहार काँग्रेसचे प्रवक्ते असित नाथ तिवारी यांनीही या मुद्द्यावर विरोधकांमध्ये एकजूट असल्याचे स्पष्ट केले.
अपक्ष आमदारांचा घूमजाव
दरम्यान, या वादानंतर भाजपाने आपले प्रसिद्धीपत्रक मागे घेतले. तसेच दोन्ही अपक्ष विधानपरिषद सदस्यांनीही आपल्या भूमिकेत बदल केला. आपण भाजपामध्ये प्रवेश केलेला नसून, केवळ पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बन्सीधर ब्रजवासी म्हणाले की, राज्य सरकारने शिक्षकांच्या तक्रारी आणि समस्या सोडवण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे मी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर राहुल राज म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे मी खूप प्रभावित झालो आहे. त्यामुळे मीदेखील भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
–बिहार भाजपा प्रदेशाध्यक्षांनीही दिले स्पष्टीकरण
या दोन्ही सदस्यांच्या भूमिकेचे समर्थन करताना बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनीही त्यांची बाजू मांडली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कामकाजाने प्रभावित होऊन या दोन्ही नेत्यांनी आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या निर्णयामुळे दोन्ही अपक्ष विधानपरिषद सदस्यांचे सदस्यत्व धोक्यात येऊ शकते का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी उत्तर देणे टाळले.


