स्मृती इराणी यांना पराभूत करणाऱ्या नेत्याला पंजाबची जबाबदारी
-पंजाबसाठी ४२ सदस्यीय समितीची घोषणा
प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसने ४२ सदस्यांची प्रदेश निवड समिती स्थापन केली आहे. यातील ४१ नेत्यांचे राजकारण पंजाबमध्येच आकारास आले. मात्र, या महत्त्वाच्या समितीत उत्तर प्रदेशातील अमेठीचे खासदार किशोरी लाल शर्मा यांनाही स्थान देण्यात आले आहे. शर्मा यांची बालपणापासूनच पंजाबशी नाळ जोडलेली आहे. १९८३ मध्ये राजीव गांधी यांच्यासोबत काम करण्यासाठी लुधियानातून दिल्लीला गेलेले शर्मा गांधी कुटुंबाच्या जवळचे मानले जातात. त्यांचे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्रही लुधियानामधीलच असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी सायंकाळी या ४२ सदस्यीय समितीची घोषणा केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघात स्मृती इराणी यांना पराभूत करणाऱ्या किशोरीलाल शर्मा यांची नियुक्ती मात्र राजकीयदृष्ट्या विशेष मानली जातेय. शर्मांनी २०१९ मधील राहुल गांधींच्या पराभवाचा वचपा काढला, त्यांच्यावर आता पंजाबमधील उमेदवार निवडीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष परगट सिंह हे या निवड समितीचे नेतृत्व करणार आहेत. माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, अमरिंदर सिंह राजा वडिंग, प्रताप सिंह बाजवा आणि ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी हे देखील निवड समितीत असणार आहेत.
काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया अनेक टप्प्यांतून पार पडते. पंजाब विधानसभेच्या ११७ जागांसाठी राज्यातील प्रदेश निवडणूक समिती संभाव्य उमेदवारांची नावे सुचवते. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीची छाननी समिती या नावांची छाननी करून अंतिम निर्णयासाठी केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवते. दुसरीकडे सत्ताधारी आम आदमी पक्षाने आतापर्यंत ७० हून अधिक उमेदवार जाहीर केले आहेत, तर अकाली दल आणि भाजप पुन्हा एकत्र येण्यासाठी चर्चा करत आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यासाठी काँग्रेस कोणते उमेदवार मैदानात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
किशोरी लाल शर्मा यांची ओळख केवळ गांधी कुटुंबनिष्ठ यापुरतीच मर्यादित नाही. त्यांनी राजकीय आखाड्यात देखील आपली ताकद दाखवून दिली. त्यांची पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांशी ओळख जोडलेली आहे. लुधियानातील आर्य कॉलेजमधून त्यांनी बीएचे शिक्षण घेतले, लुधियानातील शिवाजी नगर हे त्यांचे मूळ गाव आहे. मात्र, गेल्या वर्षी एका मुलाखतीत त्यांनी अमेठीशी असलेले विशेष नाते सांगितले. “माझ्या ६२ वर्षांहून अधिक आयुष्यातील ४० वर्षे मी अमेठीत घालवली आहेत. पंजाबमधील मुळे आजही जिवंत आहेत; पण आता मी अमेठीकर आहे आणि इथलाच झालोय,” असे ते म्हणाले होते.
शर्मा १९८३ मध्ये राजीव गांधी यांच्यासोबत पहिल्यांदा अमेठीत गेले. पुढे त्यांनी गांधी कुटुंबाचे पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेस पक्ष समन्वयकाची धुरा सांभाळली. रायबरेलीमध्ये सोनिया गांधींचे प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पडद्यामागे राहून पक्षासाठी काम करणाऱ्या शर्मा यांना काँग्रेसने २०२४ मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. पहिल्याच निवडणूकीत त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा १.६ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. या विजयानंतर ते चर्चेत आले होते.
ते स्वभावाने शांत आहे आणि नेहमी टापटीप अशा सफारी सूटमध्ये असतात. अमेठीतील विजयाला त्यांनी मात्र सूडाचे स्वरूप दिलेच नाही. “राजकारणात सूड घेणं असं काही नसतं. ते खिलाडूवृत्तीसारखं असतं. एक जिंकतो, तर दुसरा हरतो,” असे शर्मा अमेठीतील विजयानंतर म्हणाले होते.
२०२४ मध्ये अमेठीतून निवडणूक लढवण्यास सुरुवातीला शर्मा तयार नव्हते. मात्र, प्रियंका गांधी वाड्रा यांनी त्यांची समजूत काढली. “मी गांधी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी अनेक दशके काम केले. आता माझ्यासाठी काहीतरी करण्याची त्यांची वेळ आहे. त्यांना ते करू देण्यापासून मी स्वतःला रोखू नये,” असे प्रियंका गांधी म्हटल्याचे शर्मा यांनी मुलाखतीत सांगितले होते. गांधी कुटुंबाचे ‘सेवक’ हिणवले जात असल्याबद्दल शर्मा यांना विचारले असता ते म्हणाले. “मी पक्षाचा किंवा गांधी कुटुंबाचा सेवक नाही, तर स्वयंसेवक आहे. मात्र, त्यांच्याशी माझी निष्ठा कायम राहणार आहे,” असे ते म्हणाले. अमेठी गांधी कुटुंबाची आहे आणि गांधी कुटुंब अमेठीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंजाबच्या राजकारणाबाबतही शर्मा यांनी वेळोवेळी भूमिका मांडली. आम आदमी पक्षाच्या सत्ताकाळात पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे ढासळल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच, पंजाब काँग्रेसमध्ये एकजूट असून विधानसभा निवडणूक पक्ष एकत्रितपणे लढवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.


