कशी ठरली स्ट्रॅटेजी?काँग्रेसचा वोटचोर मुद्दा : भाजपाचे लोकतंत्र बचाओ
-आज सर्वत्र भाजपाची आंदोलने
प्रतिनिधी
मुंबई : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात विरोधकांची सुरु केलेली मोहिम आता भाजपसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. विरोधकांनी कथित मतचोरीचा मुद्दा लावून धरला असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात रान पेटवले आहे. सुरुवातीला विरोधकांच्या या मोहिमेची खिल्ली उडवणाऱ्या भाजपामधील काही नेत्यांना आता असे जाणवतेय की, विरोधकांच्या कथानकाला (नॅरेटिव्ह) प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात पक्ष मागे पडला आहे. त्यामुळे आता या आरोपांना उत्तर देण्यासाठी पक्षातील हालचालींना वेग आला आहे.
सुरुवातीला भाजपाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील विरोधकांच्या आंदोलनांकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधकांनी प्रतिकात्मक महाभियोगाची प्रक्रिया पार पडली, तेव्हाही भाजपा नेत्यांनी विरोधकांच्या भूमिकेची खिल्ली उडवली होती. मात्र, आता पक्ष या मुद्द्याकडे अधिक गांभीर्याने पाहू लागला आहे. विरोधकांच्या आरोपांवर केवळ टीका न करता त्यांना ठोस प्रत्युत्तर देण्याची गरज भाजपाला जाणवू लागली आहे.
लखनौमध्ये ३० ऑक्टोबरला झालेल्या उत्तर प्रदेश भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना थेट संसदेत एसआयआरच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, पावसाळी अधिवेशनात याच विषयावरील थेट चर्चेच्या मागणीवर भाजपाने नकार दिला होता. त्यामुळे विरोधकांच्या आक्रमक भूमिकेकडे आता केवळ राजकीय गदारोळ म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही, याची भाजपाला जाणीव झाल्याचे अमित शाह यांच्या वक्तव्यातून समजते. आता या कथित मतचोरीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपा कोणती खेळी खेळणार हे पाहणे औत्युक्याचे असणार आहे.
विरोधकांच्या आक्रमक मोहिमेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने आता समांतर प्रतिमोहीम सुरू केली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देशभर पदयात्रा आणि स्वतंत्र जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे कार्यक्रम पार पडले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः हैदराबादमध्ये पदयात्रेचे नेतृत्व केले. तर दिल्लीत भाजपासमर्थक नागरी संघटना ‘सिटिझन्स फॉर डेमोक्रसी’ने सध्या विशेष चर्चेत असलेल्या विरोधकांच्या प्रतिकात्मक संसदेला प्रत्युत्तर देण्यासाठी दिल्लीत प्रतिकात्मक अधिवेशन भरवले. याच प्रत्युत्तरात्मक मोहिमेचा विस्तार म्हणून ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान भाजपा उत्तर प्रदेशातील निवडणूकप्रवण भागांत सहा पदयात्रा काढणार आहे. पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि शिवराज सिंह चौहान, तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे वरिष्ठ नेते या पदयात्रांचे नेतृत्व करणार आहेत. म्हणजेच, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपने केवळ केंद्रीय पातळीवरच नव्हे, तर निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या राज्यातही मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भाजपासमोर केवळ विरोधकांच्या आरोपांना प्रभावी प्रत्युत्तर देणे हेच आव्हान नाही. तर मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला केवळ शहरी भागांतून नाही व्यापक स्तरावरुन पाठिंबा मिळत आहे, अशी भीती पक्षातील काही नेत्यांना वाटते. त्यामुळे विरोधकांच्या या मोहिमेला प्रभावी उत्तर देण्यासाठी सत्ताधारी आघाडी आपल्या नेहमीच्या राजकीय भूमिकेतून बाहेर पडून प्रभावी प्रति-कथानक शोधत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपाने आपली वैचारिक आक्रमकता अधिक तीव्र केली आहे. सत्ताधारी आघाडीने विरोधकांना ‘देशविरोधी’ आणि ‘हिंदूविरोधी’ ठरवले आहे, तर विरोधक सत्ताबदलासाठी प्रयत्न करत असून देश अस्थिर करण्यासाठी परदेशी शक्तींच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. पक्षाचे मूळ मतदार टिकवून ठेवण्यासाठी आणि जनमताच्या लढाईत आघाडी मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी वैचारिक आक्रमकता वाढवली आहे.
३१ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरोधकांवर प्रहार केला. विरोधक आता ‘अडथळे निर्माण करणारी शक्ती’ बनले असल्याचा आरोप करत त्यांनी, “भारतविरोधी शक्तींना कोणाचा पाठिंबा आहे? भारताच्या शत्रूंची भाषा कोण बोलत आहे?” असे सवाल उपस्थित केले. एसआयआर विरोधातील मोहिमेला उत्तर देताना भाजपाने आता निवडणूक प्रक्रियेवरील आरोपांपलीकडे जाऊन विरोधकांवर टीकेचे अस्त्र वापरले आहे.
विरोधकांना ‘हिंदूविरोधी’ ठरवण्याच्या भाजपाच्या भूमिकेला आणखी धार देण्यासाठी पक्षाने मंगळवारी डाव्या विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांच्या जुन्या विधानांचा मुद्दा उपस्थित केला. नेहा बोरा यांनी २०१८ च्या कठुआ प्रकरणाचा संदर्भ देत “मंदिरांमध्ये पुजारी बलात्कार करतात” असे वक्तव्य केले होते. धार्मिक स्थळे लैंगिक गुन्हेगारांना पाठीशी घालतात, असा दावा करणाऱ्या या जुन्या विधानाचा उल्लेख करत मंगळवारी भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला.
सरकारविरोधी आंदोलनातील प्रमुख चेहरा म्हणून पुढे आलेल्या बोरांवर भाजपाने विरोधकांच्या ‘हिंदूविरोधी अजेंड्याची पोस्टर गर्ल’ म्हणत टीका केली. त्यांच्या विधानांचा आधार घेत विरोधकांची भूमिका हिंदूविरोधी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला.


