मुख्यमंत्र्यांना नाही आवडला हक्काचा बंगला : हे आहे नेमके कारण?

मुख्यमंत्र्यांना नाही आवडला हक्काचा बंगला : हे आहे नेमके कारण?

-डागडुजीचे काम वेगात सुरू

प्रतिनिधी
कर्नाटक : कर्नाटकात काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर बंगळुरूतील कुमार कृपा गेस्ट हाऊसमध्ये हालचाली वाढल्या आहेत. कुमार कृपा गेस्ट हाऊसमध्ये बांधकाम मजूरांची ये-जा वाढली असून नूतनीकरणाचे काम सुरू आहे. जुन्या इमारतीच्या लगत नव्याने बांधकाम झाले होते. जुन्या इमारतीला नवीन बांधकामापासून वेगळे करण्यासाठी मजूरांनी खोदकाम केले आहे. तसेच दोन मजली गेस्ट हाऊसच्या आत लाकडी मचान उभारण्यात आली असून डागडुजीचे काम सुरू आहे. महात्मा गांधी यांनी ज्या इमारतीत वास्तव्य केले त्यात बदल केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच नवे मुख्यमंत्री अधिकृत ‘अनुग्रह’ बंगल्याऐवजी दुसऱ्या बंगल्यात का राहायला जात आहेत?

डी. के. शिवकुमार हे सध्या त्यांच्या सदाशिवनगर येथील खासगी निवासस्थानी राहतात. कुमार कृपा गेस्ट हाऊसचे नुतनीकरण झाल्यानंतर शिवकुमार तिथे राहायला जाणार आहेत. दरम्यान, कर्नाटकात मुख्यमंत्र्यांना राहण्यासाठी अधिकृतपणे ‘अनुग्रह’ हा बंगला दिला जातो. परंतु, अनुग्रह हा बंगला कर्नाटकातील अनेक नेते शापित किंवा अशुभ मानतात. मुख्यमंत्र्यांसाठी हा बंगला धार्जिण नाही, अशी एक धारणा कर्नाटकात आहे. त्यामुळेच डी. के. शिवकुमार यांनी अनुग्रह ऐवजी कुमार कृपा गेस्ट हाऊसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांचा वास्तू व भविष्यावर विश्वास आहे. कुमार कृपा गेस्ट हाऊसमध्ये होत असलेले बदल वास्तू तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात होत आहेत”, अशी माहिती नुतनीकरणाचे काम करत असलेल्या पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याने दिली.

कृमार कृपा गेस्ट हाऊसचे नूतनीकरण झाल्यानंतर गेस्ट हाऊसमध्ये जाण्यासाठी एक स्वतंत्र रस्ता असेल आणि त्याच्या आजूबाजूला सहा फूट भिंत असेल. गेस्ट हाऊसचे काम पूर्ण होण्यासाठी अजून तीन महिने लागतील, असे डागडुजी व नुतनीकरणाचे काम करणाऱ्या मजुरांनी सांगितले. तर दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात शिवकुमार या गेस्ट हाऊसमध्ये राहायला येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. डी. के. शिवकुमार यांनी कुमार कृपा गेस्ट हाऊसचे नूतनीकरण करण्याचे निर्देश पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर काम सुरू करण्यात आले.

महात्मा गांधीनी केला आहे मुक्काम 
डी. के. शिवकुमार हे स्वत:च्या सोईसाठी ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतीत बदल करत आहेत, असा आरोप विरोधी पक्ष असलेल्या जेडी(एस) ने केला आहे. “ज्या ऐतिहासिक इमारतीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी वास्तव्य केले आणि ज्या वास्तुशी म्हैसूर राज्याचे दिवाण के. शेषाद्री अय्यर यांच्या आठवणी जुळलेल्या आहेत, त्या इमारतीत डी. के. शिवकुमार हे स्वत:च्या सोईसाठी बदल करत आहेत. ही इतिहासाशी केलेली गद्दारी आहे”, असे जेडी(एस) ने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.