मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांत मानपाननाट्य : हे ठरले खरे कारण
-भिमाशंकर तीर्थक्षेत्राचा परत केला दौरा
प्रतिनिधी
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भिमाशंकर तीर्थक्षेत्राला मोजक्यात लोकांच्या उपस्थितीत गेल्या शनिवारी भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. मात्र, या दौऱ्याची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पूर्वकल्पना न दिल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सुनेत्रा पवार यांच्या ‘कानी’ घातली. त्यामुळे दुखावलेल्या सुनेत्रा पवार यांनी दुसऱ्याच दिवशी, रविवारी भिमाशंकर तीर्थक्षेत्राचा दौरा करून त्याच विकासकामाची पाहणी केल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये राजकीय ‘मानापमान नाट्य’ रंगल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील मोजकेच अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्याची जाहीरपणे वाच्यता करण्यात आली नाही. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि काही अधिकारी हे भिमाशंकर येथे शनिवारी सकाळीच हजर राहिले. मुख्यमंत्री येणार असल्याची कुणकुण लागल्याने आमदार दिलीप वळसे-पाटील आणि आमदार बाबाजी काळे हे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा; तसेच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मंदिर परिसर विकास आणि ‘हेरिटेज वाडी’ प्रकल्पाची पाहणी केली.
मुख्यमंत्री आपल्या कार्यक्षेत्रात आले; पण या दौऱ्याची माहिती गुपित ठेवण्यात आल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने उपमुख्यंमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘कानी’ घातली. त्यानंतर मानापमान नाट्य सुरू झाले.


