राज्यांना मोदी फॅक्टरचा लाभ, इंडिया म्हणते, संघराज्य संरचनेवरील हल्ला

राज्यांना मोदी फॅक्टरचा लाभ, इंडिया म्हणते, संघराज्य संरचनेवरील हल्ला
-५ सप्टेंबरला गौप्यस्फोट होणार

प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाच राज्यांत निवडणुकीची तयारी सुरू असतानाच संसद अधिवेशन बोलावल्याने व माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याने लोकसभा निवडणूक आधी होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. अधिवेशनादरम्यान खासदारांचा सामूहिक फोटो घेण्याची व्यवस्था होत असल्याचे वृत्तही समोर आले आहे. सधारणत: असे लोकसभेच्या कामकाजाच्या सुरुवातीला किंवा समारोपाला होते. तथापि, हेदेखील म्हटले जात आहे की, जुन्या संसदेतून नव्या संसदेतील स्थलांतर संस्मरणीय करण्यासाठी दोन्ही भवनांमध्ये फोटोसेशन होणार आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगण व मिझोराममध्ये डिसेंबरपर्यंत निवडणूका होणार आहेत. सरकारने ठरवले तर यासोबतच सार्वत्रिक निवडणूक आणि २०२४ मध्ये होणाऱ्या इतर ७ राज्यांच्या निवडणुकाही घेऊ शकते. भाजपचे म्हणणे आहे की, यामुळे जिथे ते कमकुवत आहेत त्या राज्यांना मोदी फॅक्टरचा लाभ मि‌ळेल. दुसरीकडे विरोधकांची आघाडी इंडियाने यास संघराज्य संरचनेवरील हल्ला म्हटले आहे. तर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, तूर्तास काहीही म्हणणे घाईचे ठरेल. ते म्हणाले, विशेष अधिवेशनाच्या अजेंड्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यांना लवकरच अंतिम रूप दिले जाईल. संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या १४ दिवस आधी अधिसूचना जारी करून सर्व पक्षांना अजेंडा सांगणे गरजेचे आहे. सर्वपक्षीय बैठक आणि बिझनेस ॲडव्हायझरी समितीत विषयावर बोलण्यासाठी सर्व पक्षांना वेळ दिला जातो. तथापि, ज्या दिवशी चर्चा होणार असते त्या दिवशी सकाळी ९ वाजता ठरलेल्या विषयांत दुरुस्ती करून इतर विषय अजेंड्यात घेतले जाऊ शकतात. अशा वेळी सूत्रांचे म्हणणे आहे की, ५ सप्टेंबरला संसदीय कार्यमंत्री अधिवेशनाच्या अजेंड्याचा गौप्यस्फोट करू शकतात.

डिसेंबर २०२४ पर्यंत १२ राज्यांत निवडणूक आहे. त्यातच सार्वत्रिक निवडणूक हाेत आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझाेराम, तेलंगणात डिसेंबर २०२३. आेडिशा, अरुणाचल, सिक्कीम, आंध्रमध्ये मे २०२४. हरियाणा, महाराष्ट्र, झारखंडमध्ये डिसेंबर २०२४.विधानसभा कार्यकाळ वाढवण्याची तरतूद नाही. त्यासाठी राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. पण त्याची शक्यता कमी आहे.

-मुदतपूर्व निवडणूक हाेईल ?

हाे. त्यासाठी कायद्याने बंधन नाही. सरकार विधानसभा किंवा संसद विसर्जित करून निवडणुकीचा बिगुल वाजवू शकते. आधीही सहा वेळा लाेकसभा मुदतीआधीच विसर्जित करण्यात आली आहे. त्यामुळेच लाेकसभा व पुढील निवडणुकीच्या ७ राज्यांत विधानसभा मुदतीच्या आधी विसर्जित करून निवडणूक हाेऊ शकते.

एडीआरनुसार २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत ६० हजार काेटी रुपये खर्च झाले. एकाच वेळी निवडणूक घेतल्याने आर्थिक बाेजा कमी होईल. वारंवार आचारसंहितेचा विकासकामांना फटका बसतो. तो नंतर बसणार नाही. नीती आयोगानुसार ३० वर्षांत दरवर्षी कोणती ना कोणती निवडणूक झाली. प्रादेशिक पक्षांना स्थानिक मुद्दे जोरकसपणे मांडता येणार नाहीत, अशी शंका वाटते. कारण राष्ट्रीय मुद्दे वरचढ ठरतील. प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत खर्चही करू शकणार नाहीत.

-१९६७ पर्यंत एक निवडणूक

१९५१ ते १९६७ दरम्यान दर ५ वर्षांत लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र व्हायच्या. १९६८-६९ मध्ये काही विधानसभा विसर्जित झाल्याने ही प्रक्रिया थांबली. त्यानंतर स्वतंत्र निवडणूका होऊ लागल्या. पाच दिवसांचे विशेष संसद अधिवेशन बोलावण्याच्या घोषणेच्या पुढच्याच दिवशी केंद्र सरकारने पुन्हा आश्चर्याचा ध्कका दिला. सरकारने शुक्रवारी ‘एक देश-एक निवडणूक’ला मूर्त रूप देण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. प्रथमच माजी राष्ट्रपतींना अशा गोष्टीत समाविष्ट करण्यात आले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निवडणुकीच्या तयारीने वेग घेतलेला असतानाच हा निर्णय आला आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत सार्वत्रिक निवडणुकांसह १२ राज्यांत निवडणूक आहे. समितीत विविध पक्षांचे सदस्य व कायद्याचे जाणकार असू शकतात. समिती या मुद्द्यावर विचार केल्यानंतर आपला अहवाल सादर करेल. समिती अहवाल किती दिवसांत देईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.