या १५ अटी : धगधगत्या संभाजीनगरात ‘मविआ’ची सभा
– अखेर पोलिसांनी दिली परवानगी
प्रतिनिधी
संभाजी नगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी १५ अटी घातल्यात. येत्या २ एप्रिल रोजी ही सभा होत आहे.
रामनवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल पेटली. त्यावरून आरोप-प्रत्यारोपाची राळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर या सभेला परवानगी मिळणार की नाही, याची चर्चा होती.छत्रपती संभाजीनगरातून महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांचा प्रारंभ २ एप्रिलपासून केला जाणार आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे सभेला मार्गदर्शन करणार आहेत. दुसरी सभा 16 एप्रिल रोजी नागपूर, 1 मे रोजी मुंबई, 14 मे रोजी पुणे, 28 मे रोजी कोल्हापूर, 3 जून रोजी नाशिक आणि नंतर अमरावती येथे संयुक्त सभा घेतली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी मराठा सांस्कृतिक मंडळावर ही सभा होणार आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली आहे.
–या आहे सभेच्या अटी
छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. त्यात काही अटी घातल्या आहेत. ही सभा संध्याकाळी 5 ते रात्री 9.45 या वेळेतच घ्यावी लागेल. सभेचे ठिकाण आणि वेळेत बदल करू नये. सभेसाठी येणाऱ्यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करू नये. सभेला येताना शस्त्र बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सभेसाठी जाताना किंवा सभेहून येताा मोटारसायकल, कार फेरी काढू नये. ध्वनिक्षेपकाच्या आवाजाबाबत कोर्टाच्या निर्देशाच्या पालन करावे. तसेच स्टेज उभारण्याआधी संबंधित कंत्राटदाराने स्टेज स्टॅबिलिटी प्रमाणपत्र पोलिसांकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संजय शिरसाट म्हणाले, महाविकास आघाडीने सभा घ्यावी. पोलिस त्यांची जबाबदारी पार पाडतील. ती पोलिसांची जबाबदारी आहे. यांना फक्त राजकारण करायचे आहे. त्यांना जर सभा घेण्यासाठी बंदी घातली, लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, असा आरोप ते करतील. मुळात त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. त्यांच्या सभेत दोन-चार टोमणे आणि डायलॉग असतील.


