या नेत्याचे जावई अडकले; क्रिप्टो करन्सी घोटाळा

या नेत्याचे जावई अडकले; क्रिप्टो करन्सी घोटाळा

-प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

प्रतिनिधी
जालना : माजी राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांनी जावई-सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विजय झोल यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पत्रकार परिषद घेत खोतकरांनी आमदार कैलाश गोरंट्याल यांच्यावर पलटवार केला. ‘गोरंट्याल खोटं बोलत आहेत, त्यांचीच उच्चस्तरीय चौकशी व्हावी, पुण्यातील इरफान नावाची व्यक्ती क्रिप्टो करन्सीचा म्होरक्या असल्याचा दावा खोतकरांनी केला आहे.

शिवसेनेच्या शाखा गोरंट्याल यांची पोटदुखी आहे, याच शाखा गोरंट्याल यांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असं अर्जुन खोतकर म्हणाले. घोटाळे करणाऱ्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या गोरंट्याल यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचंही खोतकर म्हणाले. जावई विजय झोल व कंपनीवर केलेल्या आरोपांनी व्यथित होत अर्जुन खोतकर यांनी गोरंट्याल यांच्या कौटुंबिक प्रश्नावरच घाव घातला.

कालपासून जालन्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून माजी आमदार व भाजपा नेते विलासराव खरात यांचे पुतणे किरण खरात यांनी केलेल्या क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातील वाद जालना जिल्ह्यातील दोन राजकारण्यांच्या वादाचा विषय ठरला आहे.

आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेत किरण खरात यांना अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल व कंपनी गुंडांकरवी धमक्या देत आहेत, तसंच त्यांनी घर आणि काही प्लॉटची रजिस्ट्री आपल्या नावे करून घेतली असल्याचे आरोपही केले आहेत. या सर्व आरोपांना अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले आहे. क्रिप्टो करन्सीचा हा सगळा व्यवहार पुणे येथील इरफान नावाचा व्यक्ती करत असल्याचा दावा खोतकरांनी केला.

शिंदे गटाकडे तरुणांचा ओढा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शाखा उघडल्या जात असून याच शाखा गोरंट्याल यांची पोटदुखी आहे. येणाऱ्या निवडणुकीत या शाखा गोरंट्याल यांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत’ असा इशारा खोतकर यांनी दिला आहे.