या नेत्याचा ठोस दावा : घ्या आता काँग्रेसही फुटणार
-तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे भाष्य
प्रतिनिधी
कोल्हापूर : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसनंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षही फुटण्याच्या मार्गावर आहे, असं विधान बीआरएसचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केलं आहे. राव कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा होता. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
के. चंद्रशेखर राव गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी येत आहेत. नुकतेच ते आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठूरायाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी ते पक्षबांधणीसाठी कोल्हापूरला आले. दरम्यान, त्यांनी विरोधी पक्षांच्या ‘INDIA’ सह भाजपाच्या नेतृत्वाखालील NDAवर जोरदार टीका केली. दोन्ही सरकारांकडून देशात लोकांच्या हिताची कोणतीही कामं झाली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रातील पक्षफुटीवर भाष्य करताना के.चंद्रशेखर राव म्हणाले की, सर्वात आधी काँग्रेस फुटली. शरद पवारांनी काँग्रेसला फोडलं होते. आता त्यांचा स्वत:चाच पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटला. शिवसेनाही फुटली. आता असे देखील काही लोकांकडून सांगितले जाते की, काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर आहे. राजकीय पक्षांचे आणखी किती तुकडे होणार आहेत, याचा निर्णय जनता घेईल. माझ्यापेक्षा अधिक जनतेला माहीत आहे.
महाराष्ट्रात काही घटना अशाही घडल्या आहेत. ज्यामध्ये काही युवकांनी आपलं मतदान कार्ड जाळून टाकलंय. फोडाफोडीमुळे त्यांनी आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी मतदान कार्ड जाळलंय, हे सगळं पाहून लोकांनीच काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, असेही के. चंद्रशेखर राव म्हणाले होते.


