या आमदारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर गंभीर आरोप
-राज्याच्या राजकारणात खळबळ
प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या विशेष प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले आमदार मिहीर कोटेचा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
यापूर्वी फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले दुसरे आमदार संजय केळकर यांनीही ठाणे महापालिकेच्या चौकशीची मागणी करत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळेच भाजपचे आमदार आपल्या कोणत्या वरिष्ठ नेत्याच्या इशाऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आहेत? त्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते सध्या या विषयावर काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र वरळीतील मुख्यमंत्र्यांच्या सभेला उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित न राहिल्याने सभा फ्लॉप झाल्याने तेही सावध झाले आहेत.
–काय आहे आमदार कोटेचा यांचा आरोप ?
19 जानेवारी रोजी एमएमआरडीए मैदानावर झालेल्या पंतप्रधानांच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची उघडपणे प्रशंसा केली होती. आज पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा मुंबईत येणार असून या खास निमित्ताने मुंबईत सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊ शकते, तर ठाणे महापालिकेची का नाही? असा थेट सवाल भाजप आमदाराने केला आहे. भाजप आमदार कोटेचा यांच्याप्रमाणेच केळकर यांनीही सुशोभीकरण आणि विकासकामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास 27 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
“माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी माझी इच्छा आहे.” हे वक्तव्य नागपूर जिल्ह्यातील आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आहेत. चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनीही असेच वक्तव्य केले होते.
“मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले.” राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले होते. आगामी काळात राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी आता फडणवीस समर्थक आमदार अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची प्रतिमा वादग्रस्त बनवतील, असे मानले जात आहे.


