मुख्यमंत्री शिंदेना या जलपर्यटन केंद्राचा मोह

मुख्यमंत्री शिंदेना या जलपर्यटन केंद्राचा मोह

-पाहणीसाठी भंडारा येथे दाखल

प्रतिनिधी
नागपूर : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द जलपर्यटन व राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी करण्याकरिता व भंडारा जिल्ह्यातील विविध विकास कामांचे उदघाटन, लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज १२ नोव्हेंबर रोजी नागपूर विमानतळावर ११.३० वाजता आगमन झाले. ते हेलिकॉप्टरने भंडारा कडे रवाना झाले.

शनिवारी सकाळी त्यांचे विशेष विमानाने नागपूर येथे आगमन झाले. त्यांच्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत होते. विमानतळावर आज नागपूर विमानतळावर खासदार कृपाल तुमाणे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी,जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी विमानतळाबाहेर येत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. तसेच या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांना अभिवादन केले.

मुख्यमंत्री भंडारा येथे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसीखुर्द जलपर्यटन तथा प्रकल्पाची पाहणी करतील. दुपारी १ वाजता नंतर शहरातील विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे. दुपारी २.१५ ला खातरोड रेल्वे मैदान, माधवनगर येथे जाहीर सभेस संबोधित करतील. दुपारी ४ वाजता हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण करतील. ४.३० मुंबईकडे प्रयाण करतील.