मुंबई बेस्ट आहेच; परंतु, दिल्लीत हुशारी चालत नाही

मुंबई बेस्ट आहेच; परंतु, दिल्लीत हुशारी चालत नाही
-केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा रोख कुणाकडे?

प्रतिनिधी
नागपुर : ‘मुंबई बेस्ट आहे. परंतु, दिल्लीत हुशारी चालत नाही. ज्या लोकांना मी खुप मोठे समजत होतो, ते तितके मोठे नाहीत ते तर खूप छोटे आहेत. मी ज्यांना खूप छोटे समजत होतो, त्यांच्याजवळ गेल्यानंतर मला जाणवलं की ते खुप मोठे आहेत,’ अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या विचारांना वाट मोकळी करून दिली.
नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या वक्तव्याने परत कटाक्षाचे राजकारण समोर आले आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळात मोठे फेरबदल करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भाजपच्या संसदीय मंडळातून डावलण्यात आले. गडकरींशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही संसदीय मंडळातून हटविण्यात आले. तर बीएस येडियुरप्पा, सुधा यादव, इक्बाल सिंग लालपुरा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण यांचा संसदीय मंडळात नवीन सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. तेव्हापासून नितीन गडकरी यांनी अनेकदा आपल्या भाषणातून आपली नाराजी बोलून दाखवली.

गडकरींना भाजपच्या संसदीय मंडळातून वगळल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देतानाही आपली नाराजी बोलून दाखवली होती. ”कोणाचा वापर करून गरज संपल्यानंतर त्या व्यक्तीला कधीच फेकून देऊ नका, असे म्हणत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. तसेच, जे ही कोणी व्यवसायात, सामाजिक कार्यात किंवा राजकारणात आहेत. त्यांच्यासाठी इतर माणसांशी त्यांचे असलेले संबंध ही सर्वात मोठी ताकद असते. एखाद्याचे चांगले दिवस असो किंवा वाईट दिवस असो, जेव्हा तुम्ही कुणाचा हात हातात घेतला. त्या माणसाशी मैत्री केली असेल तर तो हात सोडू नका, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी अप्रत्यक्षरित्या आपली नाराजी बोलून दाखवली आहे.