भाजपाची अनिश्चितता संपली; काँग्रेसचा उमेदवार ठरेना

भाजपाची अनिश्चितता संपली; काँग्रेसचा उमेदवार ठरेना

– नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

गजानन ढाकुलकर
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपची उमेदवारी दोन टर्म या मतदारसंघातून आमदार राहिलेले नागो गाणार यांना जाहीर झाली. त्यामुळे अनिश्चितता संपली. बुधवारी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे.

नामांकन अर्ज दाखल करण्याचा उद्या 12 जानेवारी हा शेवटचा दिवस आहे. एक दिवस आधी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला. एक काँग्रेसचा उमेदवार सोडला तर शिक्षक भारती, शिक्षक परिषद, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, वंचित बहुजन आघाडीने उमेदवार घोषित केले आहेत. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, वंचित बहुजन आघाडीचे दीपराज खोब्रागडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले आणि आज भाजप समर्थीत शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. आता काँग्रेस कोणाला पाठिंबा देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-काहींचे ठरले 8 महिन्यापूर्वी उमेदवार

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विश्वनाथ डायगव्हाणे यांनी 8 महिन्यांपूर्वीच या निवडणुकीसाठी चंद्रपूरचे सुधाकर अडबाले यांची उमेदवारी जारी केली. शिक्षक भारतीचे कपिल भारती यांनी राजेंद्र झाडे यांची महिनाभरापूर्वी घोषणा केली. या निवडणुकीच्या निमित्ताने झाडे हे तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. भाजपच्या उमेदवारीसाठी तीन प्रबळ दावेदार होते. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत काँग्रेस निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहु शकते.

–गाणार गडकरी यांचे खंदे समर्थक

नागपूर विभागातून भाजप समर्थीत नागो गाणार हे गेल्या दोन टर्मपासून प्रतिनिधित्व करीत असून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक आहेत. यावेळी भाजपच्या सहकार आघाडीचे प्रदेश संयोजक प्रा. संजय भेंडे, माजी महापौर प्रा. कल्पना पांडे, शिक्षक परिषदेचे सचिव योगेश बन यांची नावे चर्चेत होती. भाजपनेही गाणार यांना शेवटपर्यत पाठींबा जाहीर न केल्यामुळे अनिश्चितता होती. मात्र बुधवारी गाणारांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली.

–काँग्रेसचे पत्ते ओपन नाही

दुसरीकडे काँग्रेसनेही कोणाला पाठिंबा दिला नाही. शिक्षक भारतीने राजेंद्र झाडेच यांना उमेदवारी दिलेली आहे. मागील निवडणुकीत 35 हजार 9 मतदार होते. यावर्षी 39 हजार 406 मतदारांची नोंदणी झाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आचारसंहिता राहणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या शिक्षक सेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. गंगाधरराव नाकाडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असे शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी जाहीर केले आहे.

–शिक्षक भारतीचा उमेदवार काँग्रेससमर्थीत
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीने काँग्रेसला मदत केली होती. त्यामुळे आता काँग्रेसने शिक्षक भारतीला समर्थन जाहीर करावे, अशी मागणी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केली आहे. पण काँग्रेसचे अद्याप काहीही ठरले नसल्याने महाविकास आघाडीचे ब्लडप्रेशर वाढले आहे.