पुन्हा होणार शरद पवार-अजित पवार यांच्यात भेट, हे आहे कारण ?
-राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
प्रतिनिधी
नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गेल्या आठवड्यात भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट घडून आलेली. त्यानंतर आता आणखी तशाच घडामोडी घडून आल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने पवार कुटुंबिय पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे आज पुन्हा शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घडून येणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी दिवाळीच्या निमित्ताने स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाला पवार कुटुंब दुसऱ्यांदा एकत्र आल्याची माहिती समोर आली आहे.
दिवाळीच्या निमित्ताने पवार कुटुंबियांची अशी एकत्र भेट घडून येते. दरवर्षी दिवाळीला सर्व पवार कुटुंबिय एकत्र येतात. त्यातूनच आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. श्रीनिवास पवार यांच्या घरी देखील आयोजित कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार हे जेवणासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याआधी प्रतापराव पवार यांच्या निवास्थानी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घडून आली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती.
-सुप्रिया सुळेंकडून फोटो ट्विट
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी आजच्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या फोटोत सर्व पवार कुटुंबिय शरद पवार यांच्यासोबत दिवाळीचं सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. या फोटोत अजित पवार दिसत नाहीयत. पण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार दिसत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंबिय पुन्हा एकदा एकत्र आल्याची चर्चा आहे.


