नागपूर जि. प. अध्यक्ष एसटी आरक्षण; नानांच्या पदरी निराशा

नागपूर जि. प. अध्यक्ष एसटी आरक्षण; नानांच्या पदरी निराशा
-राजकीय फिल्डींग विस्कटली
-मुंडावळ्या बांधून असलेले झाले निराश
प्रतिनिधी
नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेवर एसटी प्रवर्गातील उमेदवारासाठी आरक्षण निघाले. सर्वसामान्य प्रवर्गाचे आरक्षण निघेल म्हणून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून होते. सत्ता पक्षातील ‘नानां’नी तर विरोधकांना हाताशी धरून ‘शिंदेस्टाइल’ मोर्चेबांधणी सुरू केली होती. एसटी आरक्षणाने त्यांच्या या सर्व राजकीय घडामोडींवर पाणी फेरल्याचे पहायला मिळते.

अध्यक्षपदाच्या रांगेतील अनेकांची गणिते बिघडली. जि. प. अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होईल, अशी अपेक्षा जवळपास सर्वांना होती. त्यामुळे अनेकांनी पक्षश्रेष्ठीशी सातत्याने संपर्क व मोर्चेबांधणी सुरू केली. काहींनी आरक्षणाच्या चाचपणीसाठी मंत्रालयाच्या चकरा मारल्यात. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना कंभाले यांनी उघडपणे अध्यक्षपदावर दावा केला. त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करणार, असे जाहीरपणे सांगितले. केवळ, अध्यक्षपदाच्या आरक्षण काय निघते, याकडे लक्ष होते. इतकेच नव्हे तर पक्षाकडून संधी न मिळाल्यास विरोधकांशी हातमिळवणी करून पदावर आरुढ होण्याची त्यांची तयारी होती. यासाठी विरोधकांशी चर्चा सुरू होती.

विरोधकांनी दोन पावले पुढे येत यासाठी बैठकांचे सत्र सुरू केले होते. काँग्रेस पक्षातील काही सदस्यांना ते गळाला लावण्याच्या तयारीत होते. एका महिला सभापतींच्या कक्षातून सातत्याने घडामोडी घडत होत्या. या महिला सभापतींना पुन्हा पद हवे असल्याने त्यांचाही कंभाले यांना पाठिंबा असल्याची चर्चा होती. त्या बंडखोरीच्या रांगेत असल्याचे सांगण्यात येत होते. शिंदेगट शिवसेना सदस्य संजय झाडे यांनी तर कंभाले यांना जाहीर पाठिंबा दिला होता. अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या विरोधात त्यांनी उघडपणे भूमिका घेतली होती.

-अनेकांना बसला धक्का
राज्यात शिंदे गटाने सत्ता काबिज केली. त्याप्रमाणे कंभाले यांनी विरोधकांची मोठ बांधून स्वत:चाच पक्ष फोडण्यासाठी फिडिंग लावल्याची चर्चा होती. परंतु, आता अध्यक्षपद एसटीसाठी राखिव झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला. आगामी काळात त्यांच्या अडचणी वाढू शकतात. याशिवाय, अवंतिका लेकुरवाळे अध्यक्षपदासाठी रेसमध्ये होत्या. दुधाराम सव्वालाखे, प्रकाश खापरे यांचेही नाव आघाडीवर होती. परंतु, अध्यक्षपद राखिव झाल्याने सर्वांच्या इच्छेवर पाणी फेरले.