नागपूर जि.प. अध्यक्षपद एसटीसाठी; सात सदस्य रांगेत
-वाचा नेमके कुणाचे पारडे जड
प्रतिनिधी
नागपूर : जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत निघाली असून जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष हा अनुसूचित जमातीतून असेल. शुक्रवारला(३० सप्टेंबर) निवडणूक आयोगाने याविषयीची अधिसूचना काढली.
यंदा अनुसूचित जमातीतील सामान्य अर्थात पुरुष किंवा महिला सदस्याला जिल्हा परिषदेचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार असे बोलले जात होते. उशिरा या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले. अधिकृत माहिती अथवा पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. सध्या अध्यक्षाचे पद अनुसूचित जातीसाठी राखीव असून रश्मी बर्वे हे पद भूषवित आहे. नागपूर जिल्हा परिषदेत १९९८ नंतर अनुसूचित जमातीतील सदस्याला नेतृत्वाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे यंदा याच गटासाठी हे पद आरक्षित झाल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपाकडे या सर्वांगातील एक सदस्य असल्याची माहिती आहे. तरीही राजकीय समीकरण बघता पुढील अध्यक्ष काँग्रेसचाच असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. या गटातून निवडून आलेले तसेच या जमातीच्या सदस्यांनी आपआपली फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याची वस्तुस्थिती आहे.
-हे सदस्य आहे काँग्रेसकडे
शांता कुमरे, मुक्ता कोकड्डे, पिंकी कौरती, प्रीतम कवरे, देवानंद कोहळे, हरिश उईके, नीलिमा उईके
-विरोधी भाजपाकडील सदस्य
नीता वलके
-माजी मंत्री केदारांच्या मतदारसंघात सर्वाधिक ग्रा.पं. निवडणुका
राज्यातील सात हजार ६४९ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होत आहे. अद्याप या ठिकाणी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नाही. निवडणूक आयोगाने गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील २३७ ग्रामपंचायतीचा कार्यभार प्रशासकांच्या हाती जाईल. एकाअर्थाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात. सर्वाधिक ग्रामपंचायतींची संख्या ही सावनेर तालुक्यातील आहे.
माहितीनुसार, शनिवार (१ ऑक्टोबर)पासून या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज बसण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हणजे गावात एक प्रकारचा उत्सवच असतो. जिल्ह्यातील २३७ ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता काही दिवसांत लागेल, अशी चर्चा होती. त्यामुळे राजकीय पक्षांनी वॉर्डनिहाय उमेदवारांची तात्पुरती निवड, मतदार नोंदणीची जुळवाजुळव तसेच जातीय समीकरणाची जुळवाजुळव, मतदानाची टक्केवारी कशी वाढवावी यासाठी नियोजन केले होते. इच्छुकांची धावपळ सुरू होती. काही ठिकाणी राजकीय वातावरण तापण्यासही सुरुवात झाली. काही ज्येष्ठ नेत्यांनी भूमिपूजन, लोकार्पणाचा धडाका चालविला. मात्र, निवडणूक आयोगाच्या आदेशाने अनेकांचा हिरमोड झाला. यापूर्वी कोव्हिडकाळात जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला होता. त्यामुळे तत्कालीन ठाकरे सरकारने या ग्रामपंचायतींवर प्रशासक बसविले होते. जवळपास एक ते सव्वा वर्ष हा कारभार प्रशासकाकडे होता. या ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोबरला मतदान तर १७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
-तालुकानिहाय ग्रामपंचायती
काटोल २७, नरखेड २२, सावनेर ३६, कळमेश्वर २३, रामटेक आठ, पारशिवनी २२, मौदा २५, कामठी २७, उमरेड सात, भिवापूर १०, कुही चार, नागपूर (ग्रा.) १९, हिंगणा सात


