नागपुरात नितीन गडकरी यांनी का टोचले संशोधकांचे कान?
-डॉक्टरांना दिला विश्वासाने काम करण्याचा सल्ला
प्रतिनिधी
नागपूर : आपापले ज्ञान, संशोधन, विशेषता याची एकमेकांत देवाण- घेवाण करायला हवी. प्रत्येकात एखादा न एखादा उत्तम गुण असतोच. तो माहित करून इतरांनीही आत्मसात केला पाहिजे. संशोधन खूप होते,
पण साधारणत: सरकारमध्ये संशोधन फिक्स डिपाॅझिट व्हाॅल्टमध्ये बंद होऊन जाते, असे रोखठोक प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे बोलताना केले.
आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने तीन दिवसीय “आयुर्वेद पर्व’ आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन पूर्व नागपुरातील सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. या परिषदेचा समारोप रविवारी (13 नोव्हेंबर )गडकरींच्या हस्ते झाला.
व्यवस्थेत नेमके काय आहे हे मला माहिती नाही. आपले संशोधन एकमेकांना सांगितले जात नाही. पण आपले सिक्रेट इतरांना समजता कामा नये याचे प्रयत्न केले जातात. संशोधन प्रशिक्षण आणि प्रबोधनाद्वारे इतरांपर्यत पोहोचवणे आवश्यक आहे.
–पॅथीवर विश्वास महत्वाचा
गडकरी म्हणाले, आयुर्वेदाची पदवी घेऊन अॅलोपॅथीचे इंजेक्शन देणे थांबवले पाहिजे. रुग्ण तुमच्याजवळ आल्यानंतर तुम्हीच अलाेपॅथीच्या गोळ्या आणि इंजेक्शन द्याल तर काही होणार नाही. विश्वसनीयता जपणे खूप गरजेचे आहे. आमच्या पॅथीवर आमचाच विश्वास नसेल तर लोक कसा विश्वास ठेवतील याचा विचार केला पाहिजे. म्हणून जीवनात आपण स्वीकारलेले तत्त्वज्ञान, विश्वास व ज्ञानाची खात्री बाळगून व्यवहार केला पाहिजे. योगविज्ञान, आयुर्वेद, विशिष्ट चिकित्सा पद्धती, पंचकर्म या विषयी जगात आकर्षण आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी ज्ञानाप्रति समर्पीत होणे गरजेचे आहे.
गडकरी म्हणाले, डिग्री कोणतीही असो ओळख आणि आदर ज्ञान आणि कामाने मिळते, हे लक्षात घेतले पाहिजे. अनेक डाॅक्टर त्यांनी शिक्षण घेतलेल्या उपचार पद्धतीसोबत इतर उपचार पद्धतीनेही उपचार करतात. विशेषत: ग्रामीण भागात अॅलोपॅथीचा उपयोग केला जातो. कारण इंजेक्शन घेतल्यास लवकर बरे होईल असे ग्रामीण लोकांना वाटत असते. पण, प्रत्येकाने आपापल्या पॅथीचीच प्रॅक्टीस केली पाहिजे.
-वैदिक, विज्ञान, इतिहास, संस्कृतीचे आकर्षण
गडकरी म्हणाले, आयुर्वेदाला जागतिक मान्यता देण्याचा संकल्प केला हे चांगले आहे. आपले वैदिक विज्ञान, इतिहास आणि संस्कृतीचे जगाला आकर्षण आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी व्यावसायीक शिस्त, पारदर्शकता, ज्ञानासोबतची वचनबद्धता आणि परिणामकारक मार्केटिबिलिटी आवश्यक आहे. तंत्रज्ञान सिद्ध असेल तर बाजारपेठेत खपते. पॅकेजिंग आणि औषधे गुणवत्तेची हवी. सोबतच स्वच्छता कमालीची हवी. साधेपणाची राहाणी आवडते याचा अर्थ अस्वच्छतेचा व्यवहार ठेवणे असा होत नाही.
-उपकरणे आली त्याचा उपयोग व्हावा
गडकरी म्हणाले, योगविज्ञान, आयुर्वैद भारतीय चिकित्सा पद्धती ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. यासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञानातही खूप प्रगती झाली आहे. विशेष करून चिकित्सा पद्धतीत अचूक निदान व्हावे म्हणून नवनवीन उपकरणे आलेली आहे. त्याचा उपयोग केला पाहिजे.


