डिलिमिटेशन : अन्यथा ते १६ पक्ष वाढवू शकतात एनडीएची डोकेदुखी
-दोन-तृतीयांश बहुमत मिळविण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा कस
प्रतिनिधी
नवी दिल्ली : ३० नोव्हेंबरला संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याने सत्ताधारी पक्षाकडून घटनादुरुस्ती विधेयक मांडले जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून महिला आरक्षण लागू करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. पण, संसदेत विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत मिळविण्यात सत्ताधाऱ्यांचा कस लागणार आहे. घटनादुरुस्ती विधेयकाच्या मंजुरीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे ठरत असते, त्यामुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) केवळ मोठ्या प्रादेशिक पक्षांवर नाही तर एक खासदार असणाऱ्या पक्षांवरदेखील लक्ष असणार आहे. असे केवळ १६ पक्ष आहेत, तरी त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
एप्रिलमध्ये याच घटनादुरुस्ती विधेयकावर मतदान पार पडले होते, तेव्हा यापैकी सहा पक्ष एनडीएसोबत, पाच पक्ष इंडिया आघाडीसोबत होते, तर उर्वरित पाच पक्ष तटस्थ राहिले. त्यानंतर मात्र राजकीय समीकरणे बदलली असून, शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) पुन्हा एनडीएमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे १६ पक्षांना विधेयकाच्या बाजूने वळवण्यावर भाजपाचे लक्ष असणार आहे.
घटनादुरुस्ती विधेयकासाठी संसदेत बहुमताचा आकडा गाठणे किती आव्हानात्मक असू शकते याचा अनुभव सरकारला एप्रिलमध्येच आला आहे. मतदारसंघ पुनर्रचना आणि ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक (१३१ वी दुरुस्ती) २०२६ मंजूर होऊ शकले नाही. मतदानावेळी विधेयकाच्या बाजूने २९८, तर विरोधात २३० मते पडली. उपस्थित ५२८ सदस्यांपैकी ३५२ हा दोन-तृतीयांश बहुमताचा आकडा होता. मात्र हा मिळवण्यात सत्ताधारी अपयशी ठरले.
मात्र, केंद्र सरकार आता हे विधेयक पुन्हा मांडण्याच्या तयारीत आहे. ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकात लोकसभेतील जागांची संख्या ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. प्रत्येक राज्यातील सध्याच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याची तरतूदही या प्रस्तावित विधेयकात आहे. मात्र, विधेयकाचा अंतिम मसुदा अद्याप सार्वजनिक झालेला नाही.
तृणमूल काँग्रेसपासून वेगळे झालेले २० खासदार आणि शिरोमणी अकाली दलाच्या एका खासदाराच्या पाठिंब्याने एनडीएचे संख्याबळ ३१९ आहे. त्यात द्रमुकचे २२, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आठ आणि वायएसआर काँग्रेसचे चार खासदार सहभागी झाले तर हा आकडा ३५३ पर्यंत पोहोचू शकतो.
-एनडीएला पाठिंबा देणारे छोटे पक्ष
एप्रिलमध्ये एनडीएच्या बाजूने मतदान करणारे ६ पक्ष होते. उत्तर प्रदेशातील अपना दल (सोनेलाल), आसाममधील आसाम गण परिषद, झारखंडमधील एजेएसयू पक्ष, बिहारमधील हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्युलर), सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी आणि सिक्कीममधील सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा या पक्षांचा त्यात समावेश आहे.
–इंडिया आघाडी समर्थक पक्ष
तर राजस्थानातील भारत आदिवासी पार्टी, केरळ काँग्रेस, तामिळनाडूतील मरुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम, राजस्थानातील राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष, केरळ आणि पश्चिम बंगालमधील क्रांतिकारी समाज पक्षाने एनडीएच्या विरोधात मतदान केले. या पक्षांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला प्रखरतेने विरोध केला. त्यांच्या स्थानिक भूमिका आणि या भूमिकांना लोकसभेत मिळणारे कमी महत्त्व या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी विधेयकाला विरोध केला.
–तटस्थ राहिलेले पक्ष
असदुद्दीन ओवेसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM), चंद्रशेखर आझाद यांचा आझाद समाज पार्टी (कांशीराम), सुखबीर सिंह बादल यांचा शिरोमणी अकाली दल (SAD), आसाममधील युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) आणि मिझोरममधील झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) हे पक्ष तटस्थ राहिले होते.
लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघ पुनर्रचना करण्यास ओवेसी यांचा तीव्र विरोध आहे. दुसरीकडे नुकतेच एनडीएमध्ये परतलेल्या अकाली दलाने मात्र ८ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व राज्यांच्या जागांमध्ये सरसकट ५० टक्के वाढीची अट ठेवत विधेयकाला सशर्त पाठिंबा दिला. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी ओवेसी आणि आझाद यांनी एकत्र येत ‘सामाजिक परिवर्तन मोर्चा’ची स्थापन केली असली तरी आझाद यांनी अद्याप या विधेयकावरील भूमिका स्पष्ट केली नाही; तर ईशान्य भारतातील ऐतिहासिक, भौगोलिक आणि सहाव्या अनुसूचीतील अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळाल्यास यूपीपीएल आणि झेडपीएम या प्रादेशिक पक्षांचा सरकारला पाठिंबा मिळू शकतो.
–प्रादेशिक पक्षांचा फायदा
शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि भाजपाचे पुनर्मिलन ही एप्रिलमधील मतदानानंतरची महत्त्वाची राजकीय घडामोड आहे. पक्षाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्या पाठिंब्यामुळे सरकारच्या बाजूने आणखी एका मताची भर पडू शकते. वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसचे २० फुटीर खासदार आणि हरसिमरत कौर यांच्या पाठिंब्याने एनडीएच्या बाजूने ३१९ मते एकवटतात. द्रमुकचे २२ खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आठ आणि वायएसआर काँग्रेसचे चार खासदार सोबत आल्यास हा आकडा ३५३ पर्यंत पोहोचू शकतो. द्रमुकने तमिळनाडूच्या जागांचे प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती व्यक्त करीत एप्रिलमध्ये विधेयकाला विरोध केला होता. मात्र, राज्याच्या जागांचे प्रमाण कायम ठेवण्याची लेखी हमी मिळाल्यास विधेयकावर पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहेत. शरद पवार यांच्या पक्षानेही प्रत्येक राज्याच्या जागांमध्ये एकसमान ५० टक्के वाढ करण्याच्या अटीवर पाठिंबा देण्याचे संकेत दिले तर वायएसआर काँग्रेसनेदेखील विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे.


