ठरले हे कारण : या अभिनेत्रीमुळे राहुल यांचा राजीनामा
-राहुल म्हणतात, ती माझी मैत्रीण आहे
प्रतिनिधी
केरळ : युवक काँग्रेसच्या केरळ युनिटचे अध्यक्ष राहुल मम्कुट्टाथील यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मल्याळम अभिनेत्री रिनी ॲन जॉर्जने केलेल्या छळाच्या आरोपांनंतर त्यांनी आपल्या निर्णयाची घोषणा केली.
राहुल मम्कुट्टाथील म्हणाले की, त्यांनी काहीही चुकीचे केले नाही, त्यांनी जॉर्जला ‘मैत्रीण’ असेही संबोधले आणि आपल्या विरोधात कोणतीही तक्रार असल्यास कायदेशीर मार्ग अवलंबू असे म्हणाले.
ते म्हणाले, “माझ्यावर कोणतीही कायदेशीर तक्रार आहे का? ज्या महिलेने हे विधान केले आहे, तिने माझे नाव घेतलेले नाही. ती माझी मैत्रीण आहे. राज्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यात माझ्या विरोधात कोणतीही तक्रार आहे का? पक्ष कार्यकर्त्यांनी माझा बचाव करण्याची गरज नाही. त्यामुळेच मी राज्य युवक काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. पक्षाने मला राजीनामा देण्यास सांगितले नाही,” असेही ते म्हणाले.
अभिनेत्री रिनी ॲन जॉर्जने मम्कुट्टाथील यांचे नाव घेतले नाही, परंतु भाजपाने आरोप केला की, अभिनेत्री पालक्काडच्या आमदाराविषयीच बोलत आहे. जॉर्जने त्यांच्यावर अनेकवेळा आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचा आणि तिला त्यांच्या हॉटेल रूममध्ये बोलावल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपाने काँग्रेसचे पालक्काडचे आमदार राहुल मम्कुट्टाथील यांच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
राहुल मम्कुट्टाथील यांना राहुल बीआर म्हणूनही ओळखले जाते. ते केरळमधील काँग्रेस पक्षाच्या तरुण चेहऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहास आणि इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी विद्यार्थी राजकारणातून राज्याच्या राजकारणात प्रवेश केला. छळाच्या गंभीर आरोपांनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
अभिनेत्री जॉर्जच्या आरोपानंतर लेखिका हनी भास्करन यांनी मम्कुट्टाथील यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला संदेश पाठवल्याचा आरोप केला. मम्कुट्टाथील यांनी तिच्या इन्स्टाग्रामवरील एका फोटोवर प्रतिक्रिया दिली, त्यानंतर त्यांच्यामध्ये संवाद सुरू झाला. भास्करन यांनी आरोप केला की, आमदार आपल्या समवयस्क महिलांबरोबर नेहमीच अश्लील पद्धतीने संवाद साधतात. भास्करन यांनी मल्याळम वृत्तपत्र ‘मनोरमा’ला सांगितले, “मी त्यांच्या अनेक पीडितांना ओळखते आणि आणखी महिला तक्रारी घेऊन पुढे येतील. तो प्रत्येक महिलेला सांगतो की तिच्यावरच त्याचे प्रेम आहे,” असे त्या म्हणाल्या.


