खासदार बाळू धानोरकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

खासदार बाळू धानोरकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
-कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

प्रतिनिधी
चंद्रपूर : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (वय 48) यांचे मंगळवारी पहाटे दिल्लीत उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज वणी-वरोरा बायपास मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी धानोरकर यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. राज्यभरातील नेते त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वरोरा येथे आले आहेत.

बाळू धानोरकर पार्थिव दिल्लीहून नागपूरमार्गे मंगळवारी दुपारी दीड वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. बाळू धानोरकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून मोठी गर्दी केली होती. बाळू धानोरकर यांचा जनसंपर्क दांडगा होता. तसेच, कार्यकर्त्यांसोबतही त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देताना अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. केवळ चंद्रपूरच नव्हे तर विदर्भ व इतर भागातील कार्यकर्तेही आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी वरोरा येथे आले आहेत. तसेच, राज्यभरातील नेतेही अंत्यसंस्कारासाठी वरोरा येथे आले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आदी नेत्यांनी धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली.

26 मे रोजी बाळू धानोरकर यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. ते उपचाराला प्रतिसाद देत असतानाच त्यांची मंगळवारी पहाटे प्राणज्योत मालवली. दोन दिवसांआधीच त्यांचे पिता नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणावर टीका, मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरले होते.