अजित पवारांची पुन्हा जीभ घसरली : दिले द्रौपदीचे उदाहरण

अजित पवारांची पुन्हा जीभ घसरली : दिले द्रौपदीचे उदाहरण

-राज्यभरात वक्तव्याची चर्चा

प्रतिनिधी
इंदापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या भाषणात केलेल्या वक्तव्याची चर्चा चांगलीच रंगताना दिसते आहे. खरंतर अजित पवार हे मुलींच्या जन्मदराबाबत बोलत होते. मात्र त्यांनी द्रौपदीचं उदाहरण दिलं. त्यांना आपण काय बोलून गेलो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने हात जोडत मी विनोद केला गांभीर्याने घेऊ नका असंही सांगितलं. मात्र त्यांच्या या वक्तव्याची चर्चा मात्र सुरु झाली आहे.

“आम्ही मधल्या काळात पाहिलं, मुला-मुलींच्या जन्मदरात महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये इतकी तफावत होती की १ हजार मुलं जन्माला आल्यानंतर ८०० ते ८५० मुली जन्माला येत होत्या. काही वेळा हा जन्मदर ७९० इतकाही कमी झाला होता. मी म्हटलं की पुढे द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?, असा प्रसंग त्यावेळेस येईल.” अजित पवारांनी हे वाक्य उच्चारलं आणि तातडीने म्हणाले, “यातला गंमतीचा भाग सोडून द्या, नाहीतर लगेच म्हणतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला, मला कुणाचाही अपमान करायचा नाही.” तसंच त्यांनी हातही जोडले. अजित पवार यांनी जरी हात जोडून वेळ मारुन नेली असली तरीही हे वाक्य चर्चेत आलं आहे. इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्य मेळाव्यात बोलत असताना अजित पवारांनी हे वाक्य उच्चारलं आहे.