सरन्यायाधीशांचे शेड्युल; होळीपूर्वी महाराष्ट्रातील सुनावणी पूर्ण होणार
-निकाल १५ दिवसांत येणार
प्रतिनिधी
नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणावर आजपासून पुन्हा घटनापीठासमोर सलग सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे.
याच आठवड्यात हे प्रकरण संपवायचे आहे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान केले. शिंदे गटाने परवापर्यंत आपला युक्तिवाद पूर्ण करावा, असे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत. सध्या ठाकरे गटाचे वकील अॅड. अभिषेक मनु सिंघवी आणि अॅड. देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत. त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करतील.
-असा आहे अॅड. अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद
महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना शिवसेनेकडून व्हीप जारी केला गेला. आमच्यावर कधीही अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते. राज्यपालांचा बहुमत चाचणीचा आदेश चुकीचा, 10 व्या सुचीतील अधिकारांचा गैरवापर करण्यात येत आहे. सरकार निवडून आल्यानंतर विश्वासमत प्रस्तावाबाबत राज्यपालांचे अधिकार काय?, असा सवाल न्यायमूर्तींनी अभिषेक मनु सिंघवी यांना केली.
त्यावर आमदारांच्या अपात्रतेवरील कारवाई प्रलबिंत असेल तर राज्यपाल विश्वासमत ठरावाबाबत निर्णय घेऊ शकत नाही, असे अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.
अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, राज्यपालांचे अधिकार काय? याबाबत तपासणी होणे आवश्यक आहे.
-राज्यपाल ठोस कारणाशिवाय निर्णय घेऊ शकत नाही
राज्यपालांना सत्ताधारी पक्षात फूट दिसून आली तरीही त्यांनी निर्णय घ्यायचा नाही का?, असा सवाल न्यायमूर्तींनी केला. त्यावर पक्षाच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्यपालांना नाही. राज्यपाल ठोस कारणाशिवाय निर्णय घेऊ शकत नाही, असे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. फुटीर गटाला राज्यपाल गृहीत धरू शकत नाही का?, असा सवाल न्यायमूर्तींना केला. त्यावर राज्यपालांना ते अधिकार नाहीत. राज्यपालांनी आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जात निर्णय घेतला, असे अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले. 10 व्या सूचीनुसार राज्यपाल फुटीर गटाला मान्यता देऊ शकत नाही, असा युक्तिवाद अॅड. कपिल सिब्बल यांनी केला.
-काय आहे अॅड. देवदत्त कामत यांचा युक्तिवाद
प्रतोदपदाच्या नियुक्तीबाबत अॅड. कामत युक्तिवाद करत आहेत. शिंदे गटाने प्रतोदपदाच्या नियुक्तीचे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले. मात्र, अध्यक्ष एखाद्या पक्षाच्या पत्राला मान्यता देऊ शकतात. एखाद्या गटाच्या पत्राला मान्यता देऊ शकत नाही. सत्तासंघर्षात नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर त्यांनी शिंदे गटाच्या पत्राला मान्यता दिली व प्रतोदपदीची नियुक्ती मंजूर केली. ही नियुक्ती नियमबाह्य आहे.
3 जुलैला विधानसभा अध्यक्षांनी प्रतोद बदलण्याचा घेतलेला निर्णय हा शिंदे गटाच्या पत्रावर घेतला आहे. हे पत्र राजकीय पक्षाने नव्हे तर विधिमंडळ पक्षाने लिहिले होते. राजकीय पक्ष व विधिमंडळ पक्ष वेगवेगळे आहेत. विधानसभा अध्यक्षांना केवळ पक्षाच्या पत्रावर निर्णय घेता येतो. पक्षाच्या विधिमंडळातील एखाद्या गटाला अध्यक्ष मान्यता देऊ शकत नाही. व्हीप ठरवण्याचा संसदीय कामकाजाशी काहीही संबंध नाही. व्हीप ठरवणे हे विधानसभा अध्यक्षांचे काम नाही, त्यावर निर्णय घेणे घटनात्मकदृष्ट्या बेकायदेशीर आहे.
एखादा गट वेगळा झाल्यानंतर तो पक्षावर दावा करू शकतो का? असा दावा करत तो गट निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो का?, असा सवाल अॅड. कामत यांनी केला. कामत म्हणाले, नियमानुसार पक्षप्रमुखच पक्षाबाबतचे निर्णय घेऊ शकतात. 2018 च्या बैठकीत ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. याबाबत विधानसभा अध्यक्षांना माहिती दिली होती. याच आठवड्यात प्रकरण संपवायचे आहे. शिंदे गटाने परवापर्यंत युक्तिवाद पूर्ण करावा, असे महत्त्वपूर्ण निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले.
-निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो, अशी महत्त्वाची माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. या आठवड्यात ठाकरे गट तसेच शिंदे गटाचे वकीलही बाजू मांडणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात निकाल लागू शकतो, असे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.


