विषयच संपला : हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार नाही

विषयच संपला : हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार नाही
-मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडील खाती इतरांकडे

प्रतिनिधी
मुंबई / नागपूर : हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडील खात्यांचे अधिवेशनासाठी तात्पुरते वाटप केले आहे. मंत्रिमंडळातील पूर्वीच्या मंत्र्यांकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची अतिरिक्त जबाबदारी अधिवेशन काळापुरती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची तात्पुरती जबाबदारी शंभूराज देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. पणन खाते दादाजी भुसे यांच्याकडे तर सामाजिक न्याय व विशेष सहाय खाते संजय राठोड यांच्याकडे देण्यात आले आहे. मृदा व जलसंधारण खातं तानाजी सावंत यांच्याकडे देण्यात आले आहे तर अल्पसंख्यांक विकास खातं अब्दुल सत्तार यांच्याकडे तात्पुरतं दिले आहे. पर्यावरण आणि सामान्य प्रशासन मंत्रालयाची जबाबदारी दीपक केसरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन खात्याची जबाबदारी तात्पुरती संदिपन भुमरे यांना दिली आहे. तर माहिती व जनसंपर्क खातं गुलाबराव पाटील यांच्याकडे दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे असलेली अधिकच्या खात्यांची जबाबदारी अधिवेशन काळापुरती सध्याच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांकडेच दिल्यानं आता अधिवेशनाआधी विस्ताराच्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

-हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात
राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 18 कॅबिनेट मंत्री असे एकूण 20 मंत्री आहेत. तिकडे नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी जोरदार तयारी सुरु आहे. नागपूर अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जाऊ लागली होती. प्रशासनाने रवीभवन आणि नागभवन परिसरात तब्बल 40 बंगले मंत्र्यांसाठी तयार केले होते. राज्यात सध्या वीस मंत्री असताना चाळीस बंगले तयार केले जात असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं बोललं जात होतं. मात्र आता ही शक्यता मावळली आहे.

-फडणवीसांची रणनीती असल्याची चर्चा
मंत्रिमंडळ विस्ताराआधी महामंडळांचे वाटप होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. महामंडळं देऊन काही आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना खूश करण्याची शिंदे आणि फडणवीसांची रणनीती असल्याची रणनीती असल्याची चर्चा रंगत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर संभाव्य नाराजी दूर करण्याचे हे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.