रेकॉर्डब्रेक होणार : खोके सरकारविरुद्ध मुंबईतील वज्रमुठ सभा

रेकॉर्डब्रेक होणार : खोके सरकारविरुद्ध मुंबईतील वज्रमुठ सभा

-पटोले, पवार आणि ठाकरे यांची भाषणे होणार

प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज महाराष्ट्र दिनी मुंबईत होत आहे. मुंबईतील वांद्रे–कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे होणारी सभा ही अतिभव्य आणि रेकॉर्डब्रेक ठरणार, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. सायंकाळी 5 वाजता ही सभा होत असून यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विरोध पक्षनेते अजित पवार यांची भाषणे होणार आहेत.

देशाच्या संविधानाचे रक्षण, हुकूमशाहीचा तीव्र विरोध आणि राज्यातील घटनाबाह्य खोके सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा होत आहे, असे मविआच्या नेत्यांनी सांगितले आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे मविआची वज्रमूठ सभा झाली होती. या सभांमध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकार तसेच भाजपवर सडकून टीका केली होती. त्यानंतर ही तिसरी वज्रमूठ सभा ठाकरेंचे होमग्राऊंड असलेल्या मुंबईत होत आहे. त्यामुळे ही सभा जंगी करण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे.
उद्धव ठाकरे या सभेत काय बोलणार?, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते हजर राहतील. सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार सहभागी होणार किंवा कसे याबाबत संभ्रम आहे. मात्र, ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजित पवार व नाना पटोले हेदेखील सभेला मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बारसू प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटात मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. तर, अजित पवार यांनी अशा प्रकल्पांची महाराष्ट्राला गरज आहे. यात कुणीही राजकारण करू नये, अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर असल्याने ते बारसू प्रकल्पाबात काय भूमिका मांडतात?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सभेसाठी विराट संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन महाविकास आघाडीने मुंबईकरांना केले आहे. दरम्यान, या सभेपूर्वी आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक निकालामध्ये मविआला यश मिळाले आहे. त्याचा उल्लेख करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ‘कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राने पुनश्च दाखवले की येथे गद्दारीला स्थान नाही. हेच आपल्याला येत्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसणार आहे’