राज्यातील या मंत्र्यांवर भूखंड घोटाळ्याचा आरोप
-हा नेता म्हणाला, गद्दाराचे कारनामे
प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा बिवलकर भूखंड घोटाळाप्रकरणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या ‘एक्स’वर एक व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यात हा घोटाळा सोप्या भाषेत समजावून सांगितल्याचे म्हटले आहे.
-व्हिडीओमध्ये नक्की काय?
रोहित पवार यांनी व्हिडीओ शेअर करीत लिहिले, “नवी मुंबई येथील सिडकोच्या सुमारे पाच हजार कोटी रुपये किमतीच्या भूखंडाचे प्रकरण काय आहे हे अत्यंत सोप्या भाषेत या व्हिडीओमधून अवश्य बघा!” त्यांनी त्या व्हिडीओखाली #गद्दारांचे_कारनामे, असेदेखील लिहिले आहे. या प्रकरणात रोहित पवार यांच्याकडून शिरसाट यांच्यावर सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. या व्हिडीओमध्येदेखील शिरसाट यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.
बिवलकर कुटुंबीयांनी मराठा साम्राज्याच्या विरोधात ब्रिटिशांना मदत केल्याने चार हजार एकरपेक्षा जास्त जमीन राजकीय इनाम म्हणून दिली होती. परंतु, त्यानंतर आलेल्या अनेक नियम आणि कायद्यांनुसार ही जमीन सरकारजमा झाली. संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय घेतला, असा आरोप रोहित पवारांनी केला.
शिरसाटांनी ६१ हजार स्केअर मीटर अशी जमीन, ज्याचे बाजार मूल्य पाच हजार कोटी आहे. ती जमीन बिवलकर कुटुंबाला दिली. मात्र, हे सर्व आरोप शिरसाट यांनी फेटाळून लावले आहेत आणि या प्रकरणात कोणताही घोटाळा झाला नसल्याचे त्यांचे सांगणे आहे. सिडको या राज्य शासनाच्या नियोजन संस्थेचे निर्णय एक व्यक्ती घेत नसून, संचालक मंडळ घेते, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली आहे.
या प्रकरणात रोहित पवार यांनी शिरसाटांवर काय आरोप केले?
गेल्या महिन्यात रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत पाच हजार कोटींचा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचे म्हटले होते आणि संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. रोहित पवार म्हणाले होते की, ही गोष्ट्र ब्रिटिश काळापासूनची आहे. बिवलकर कुटुंबीयांनी मराठा साम्राज्याच्या विरोधात ब्रिटिशांना मदत केल्याने त्यांना चार हजार एकरपेक्षा जास्त जमीन राजकीय इनाम म्हणून देण्यात आली होती. रोहा, पनवेल, अलिबाग, उरण या जिल्ह्यांतील १५ गावांत ही जमीन आहे. १९५२ मध्ये या बिवलकर कुटुंबाने ‘गोलमाल’ केला. बॉम्बे सरंजाम जाहगिरी व अन्य इनामे याचा नियम १९५२ मध्ये आला. बिवलकर कुटुंब हुशार होते. त्यांनी ब्रिटिशांनी राजकीय इनाम म्हणून दिलेली ही जमीन तेथील अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यक्तिगत इनाम, अशी दाखवली.


