राजकीय वर्तुळाच्या नजरा; भंडारा-गोंदिया मतदारसंघ कुणाकडे ?
– भाजप कुणबी उमेदवार देण्याच्या तयारीत
प्रतिनिधी
नागपूर : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. भाजपचे काम तर बुथस्तरापर्यंत जाऊन पोहोचले आहे. हेवीवेट नेते खासदार राहिलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण २००४ पासून या मतदारसंघाने कुणालाही दुसऱ्यांदा संधी दिलेली नाही.
२००४ ते २००९ भाजपचे शिशुपाल पटले खासदार होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करून ते निवडून आले होते. २००९ मध्ये शिशुपाल पटलेंला हरवून प्रफुल्ल पटेल खासदार झाले. त्यावेळी नाना पटोले अपक्ष लढले होते. तेव्हा त्यांनी एक लाखाच्या वर मते घेतली होती. २०१४ ते २०१८ नाना पटोले भाजपचे खासदार होते, त्यांनी प्रफुल्ल पटेलांना पराभूत केले होते. नानांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे ८ महिन्यांसाठी खासदार झाले होते.

२०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रफुल्ल पटेल लढले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करून भाजपचा राजीनामा दिल्यानंतरही कॉंग्रेसने नाना पटोलेंना तिकीट दिले नाही. कारण ती परंपरागत राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी सोडलेली आहे. तरी प्रफुल्ल पटेल इच्छुक नव्हते. मधुकर कुकडे जिल्हाध्यक्ष राहून चुकले होते. ८ महिने मधुकर कुकडे खासदार राहिल्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे विजयी झाले. या मतदारसंघाचा इतिहास बघता सुनील मेंढे यांनी २०२४ मध्ये उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच दिसत, असल्याचे जाणकारांचे मत आहे.
या मतदारसंघात पोवार समाज विरुद्ध कुणबी समाज असा सामना रंगतो. फक्त २०१९ मध्ये कुणबी विरुद्ध कुणबी असा सामना झाला. भंडारा जिल्ह्यात तुमसर, मोहाडी, साकोली, लाखनी हा बावणे कुणबी समाजाचा पट्टा आहे. गोंदियात पोवार समाज मोठा आहे. २०२४मध्ये राष्ट्रवादीने पोवार समाजाच्या उमेदवाराला तिकीट दिले, तर भाजप कुणबी उमेदवार देईल, हे निश्चित आहे. भाजप दर वेळी नवीन चेहरा शोधत असते.


