राजकीय भूकंप! भाजपाचे १५ आमदार काँग्रेसच्या संपर्कात
-या नेत्याच्या दाव्याने खळबळ
प्रतिनिधी
कर्नाटक : महाराष्ट्र व हरियाणापाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आपलं लक्ष्य बिहारकडे वळवलं आहे. बिहारमध्ये यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, त्याआधी पक्षाला कर्नाटकात मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील संघर्ष मिटविण्यासाठी काँग्रेसकडून आमच्या पक्षातील आमदारांना फूस लावली जात असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. तर काँग्रेसनेही या आरोपांना प्रत्युत्तर देत भाजपाचे १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.
राज्याचे उद्योगमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते एम. बी. पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, भाजपात सध्या प्रचंड अस्वस्थता असून काही आमदारांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आमच्याकडे सध्या १४० हून अधिक आमदारांच संख्याबळ आहे. काँग्रेस सरकार पाडण्याचे भाजपाचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, कारण त्यासाठी किमान ८० ते ८५ आमदार फुटायला हवेत. २०१९ मध्ये त्यांनी आमचे १९ आमदार फोडले आणि सत्ता काबिज केली होती; पण आता तसं होणार नाही. तुम्ही कोणत्या ‘ऑपरेशन कमळ’बद्दल बोलत आहात? आज त्यांच्या आमदारांनीच आमच्याकडे यायचे प्रयत्न सुरू केले आहेत.”
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानेही दावा केलाय की, भाजपामधील काही आमदारांनी काँग्रेसमध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विजयेंद्र समर्थक गट आणि जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील गटांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे अनेक भाजपा आमदार नाराज झाले आहेत. जेडीएसमध्येही एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वावर नाराजी आहे. काही आमदार पक्षांतरासाठी तयार असून योग्य वेळेची वाट पाहत आहेत, असंही ते म्हणाले.


