राजकारण: भाजपा म्हणते, खरे माफिवीर हे माजी पंतप्रधान

राजकारण: भाजपा म्हणते, खरे माफिवीर हे माजी पंतप्रधान

-थेट ऐतिहासिक दस्त केले सादर

प्रतिनिधी

मुंबई : पंडित जवाहरलाल नेहरू हे माफीवीर आहेत. तुरुंगवास सहन न झाल्याने ब्रिटिशांची माफी मागून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली, असा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी नेहरूंच्या आत्मचरित्राचा संदर्भ देत काही कागदपत्रेही सादर केली आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल अकोला जिल्ह्यातल्या चान्नी येथे सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या माफीनाम्याची कागदपत्रे सादर केली. या माफीनाम्यातील शेवटची ओळ राहुल गांधी यांनी वाचून दाखवली. मी तुमचा नोकर राहू इच्छितो, असे सावरकर यांनी माफीनाम्यात म्हटल्याचे राहुल म्हणाले. त्यावरून आता भाजपने नेहरू माफीवीर असल्याचे म्हटले आहे.

-चौघांचा आळ एकावर टाकला

महाराष्ट्र भाजपने पंडित जवाहरलाल नेहरू हे माफीवीर असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी नेहरूंच्या आत्मचरित्राचा दाखला देत काही कागदपत्रे ट्विट केली आहेत. त्यात असे म्हटले आहे की, 14 दिवसाचा तुरुंगवास सहन न झाल्याने पंडित नेहरू यांनी वडील मोतीलाल नेहरूंच्या मध्यस्थीने ब्रिटीश सरकारची माफी मागितली. त्यानंतर ते नाभा तुरुंगातून बाहेर पडले. एवढच नाही एकूण 4 जणांना अटक केले असता, नेहरूंनी त्यांच्या जवळच्या मित्रांची सुटका करून घेतली व चौघांचा आळ एकावर टाकून तुरुंगातून तिघांनी सुटका करून घेतली.

-तडक व्हाईसरॉयची भेट व सुटका

भाजपने आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, जेलमधील घाण आणि रोगराई पाहून नेहरूंना आपल्या जीवाची भीती वाटत होती. एका मोठ्या राजकीय घराण्याशी संबंधित असल्याने खुद्द व्हाइसरॉयने त्यांची चौकशी केली. त्यावेळी जवाहरलाल नेहरूनी आपल्या वडिलांना पत्र लिहून इथली अवस्था सांगितली. मोतीलाल नेहरूंनी तडक व्हाईसरॉयची भेट घेत सुटकेची मागणी केली.