या महिला नेत्याचा थेट आरोप : काँग्रेसमध्ये हिंदुंना डावलण्यात येते

या महिला नेत्याचा थेट आरोप : काँग्रेसमध्ये हिंदुंना डावलण्यात येते

-मुस्लीमबहुल भागात प्रचारासाठी फिरकू दिले नाही

प्रतिनिधी
अकोला : आमदार साजिद खान पठाण यांच्यामुळे पराभव झाला. प्रभागातील मुस्लीम बहुल भागात प्रचारासाठी येण्याची वारंवार विनंती करूनही आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आमदारच पराभवासाठी जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक दोनमधील काँग्रेसच्या महिला उमेदवार चांदणी शिंदे यांनी केला. काँग्रेसमध्ये हिंदुंना डावलण्यात येत असून पक्षात विचारधारा राहिली नाही, अशी टीका उमेदवाराचे पती तथा महानगर महासचिव रवी शिंदे यांनी केला.

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षातील नाराजी नाट्य समोर आले. पक्षाच्या माजी नगरसेविका चांदणी शिंदे व महानगर महासचिव रवी शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आमदार साजिद खान पठाण यांना पराभवासाठी जबाबदार धरले. त्यांनी आमदार व पक्षाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. प्रभाग क्रमांक दोनमध्ये चांदणी शिंदे यांना ६४३ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी ‘एआयएमआयएम’ची जागा निवडून आली.

महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतरही पक्षाचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी जाणीवपूर्वक निवडणुकीत साथ दिली नाही. प्रभागातील मुस्लीम बहुल भागात प्रचारासाठी त्यांना वारंवार निमंत्रित केले. ते आले असते, तर मुस्लीम समाजाची मते मिळाली असती आणि पक्षाचाच फायदा झाला असता. ते शेवटपर्यंत आले नाहीत. त्यांनी दुर्लक्ष केले. प्रभागात त्यांनी प्रचार केला नसल्याने आमचा पराभव झाला. यासाठी केवळ आमदार साजिद खान पठाण जबाबदार आहेत, असा आरोप माजी नगरसेविका चांदणी शिंदे यांनी केला.

आमदार पठाण यांनी कटकारस्थान रचून प्रभाग क्र.दोनमध्ये जाणीवपूर्वक पराभव केला. निवडून येऊ द्यायचे नव्हते तर पक्षाचा एबी फॉर्मच द्यायचा नसता. काँग्रेस पक्षात हिंदुंना डावलण्यात येत आहे. हिंदू समाजासाठी काँग्रेस पक्षात विचारधारा राहिली नाही, अशी टीका रवी शिंदे यांनी केली. पक्षाचे २१ नगरसेवक निवडून आणण्याचे श्रेय लाटणाऱ्या आमदारांनी आमच्या पराभवाचेही श्रेय घेतले पाहिजे, असा टोला देखील शिंदे यांनी लगावला.

प्रभाग दोनमधील पराभवाच्यानिमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत कलह व नाराजी नाट्य चव्हाट्यावर आले आहे. काँग्रेस पक्षांतर्गत प्रचंड खदखद आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत वर्चस्व असलेल्या काँग्रेसचा आताच्या निवडणुकीत प्रभाग दोनमध्ये संपूर्ण सफाया झाला. काँग्रेससाठी हा आत्मचिंतनाचा विषय ठरणार आहे.