या खात्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला १०० दिवसांचा हिशेब

या खात्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला १०० दिवसांचा हिशेब

-कामगिरीच्या प्रगती पुस्तकाचे प्रकाशन

प्रतिनिधी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात ऊर्जा विभागाच्या अंतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व महाऊर्जा या कंपन्यांनी केलेल्या कामगिरीच्या प्रगती पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. ऊर्जाखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या खात्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आगामी २५ वर्षांच्या राज्याच्या वाटचालीच्या अनुषंगाने ऊर्जा क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्याची योजना निश्चित केला आहे. त्यांच्या व्हिजनला अनुसरून पहिल्या शंभर दिवसात वीजविषयक सार्वजनिक कंपन्यांसाठी विविध उद्दीष्टे ठरविण्यात आली होती. त्या उद्दीष्टांची माहिती व ती किती पूर्ण झाली याचा लेखाजोखा देणारे ‘हंड्रेड डेज फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स’ हे पुस्तक महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी लिहिले आहे.

एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या वेळी पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघना साकोरे बोर्डिकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, उद्योग सचिव पी. अनबलगन, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., मुख्यमंत्र्यांच्या सचिव अश्विनी भिडे, एमएसईबी होल्डिंग कंपनीचे वित्त संचालक अनुदीप दिघे, स्वतंत्र संचालक आशिष चंदराणा आणि नीता केळकर उपस्थित होते.