मोठी घडामोड: 8 आमदारांसह शिंदे सरकारचा पाठिंबा काढणार
-राणा प्रकरणावरून बच्चू कडू यांचा इशारा
-पुराव्यांसाठी 1 नोव्हेंबरची डेडलाइन
प्रतिनिधी
नागपूर : लग्नात गेलो की खोकेवाला आला म्हणतात. 50 आमदारांना खरच खोके दिले का, हे आता शिंदे-फडणवीसांनीच स्पष्ट करावे, अशी संतप्त मागणी आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात आयोजित पत्रपरिषदेतून केली. आमदार रवी राणांवर कारवाई नाही केली तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नोटीस देणार आणि सात ते आठ आमदार आमची भूमिका जाहीर करू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला.
रवी राणा आपण देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या जवळचे असल्याचे सांगत असतात. त्यामुळे त्यांना आरोपांमागे कुणाची फूस तर नाही ना, अशी शंका येऊ लागली आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याची आणि स्टंटबाज रवी राणा यांना समज देण्याची मागणी कडू यांनी केली. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सत्तेवर लाथ मारणारा माझ्यासारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही असे सांगितले. म्हणूनच मी राणा यांच्यावर पोलिसात गुन्ही दाखल केला आहे. त्यांनी आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागवी, त्यांना जशाच तसे उत्तर देऊ असा जोरदार पलटवार बच्चू कडू यांनी केला.
महाराष्ट्राच्या विकासाची खुंटलेली गती वाढविण्यासाठी आणि जनादेशाचा आदर करून राज्यातील 50 आमदारांनी स्वतःहून एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी तर मंत्रीपदाचा त्याग करून शिंदेना समर्थन दिले. त्यावेळेपासून ठाकरे गटाकडून या 50 आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप होत आहेत.
-संपूर्ण 50 आमदार नाराज
विरोधक म्हणून आणि सत्तेवरुन पायउतार व्हावे लागल्यामुळे त्यांचे आरोप आम्ही समजू शकतो. त्याला जनताही फारशी गांभीर्याने घेत नाही. मात्र, आता कधी आघाडीच्या तर कधी भाजपच्या आडोशाला राहून स्टंटबाजी करणाऱ्या आमदार रवी राणा यांच्याकडूनच खोक्यांचे आरोप माझ्यावर झाले आहे. रवी राणा यांच्यामुळे केवळ मीच नाही तर सबंध 50 आमदार नाराज झाले आहेत. अनेकांनी मला फोन करुन याबाबत त्यांची भूमिका मांडली. राणा यांचे आरोप हे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही शिंतोडे उडवणारे आहेत.
-सत्तेचा मोह कधीच नव्हता आणि नाही
माझे आजपर्यंतचे राजकारण हे कायम संघर्षाचे राहिले आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात राहिले आहे. मला सत्तेचा मोह कधीच नव्हता आणि नाही. मंत्रीपद मिळो अथवा न मिळो. असले खोटे आरोप मी कधीही सहन करणार नाही. अत्यंत गरिबीतून आणि काबाडकष्ट करून मी माझ्या जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर चार वेळा आमदार झालो.
जनतेने दिलेल्या या पुण्याईवर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तर ते सहन केले जाणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करवी. जेणेकरून हे आरोपांचे मळभ दूर होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ते मला योग्य तो न्याय देतील, अशी अपेक्षा आहे.


