मोठी घडामोड : या राज्यातील सरकार आले अडचणीत

मोठी घडामोड : या राज्यातील सरकार आले अडचणीत

-गुर्जर समाजाचे आरक्षण तापणार

प्रतिनिधी
राजस्थान : भाजपा सरकार सत्तेत येऊन जवळपास १७ महिन्यांचा कालावधी लोटला; पण त्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आमच्या समाजाच्या मागण्यांकडे लक्ष्य दिले नाही, असा आरोप गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय बैसला यांनी केला. सरकारने आरक्षणाचा प्रश्न व आमच्या समाजाच्या इतर मागण्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा मोठं आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

राजस्थानमध्ये सध्या गुर्जर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. ज्यामुळे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय बैसला म्हणाले, “गेल्या १७ महिन्यांपासून आम्ही आरक्षणाबाबत सरकारशी सातत्याने चर्चा करत आहोत; पण काहीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे समाजातील नेत्यांनी महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे, बैसला हे भाजपाचे नेते असून २०२३ मध्ये त्यांनी टोंकच्या देवली-उनियारा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. परंतु, काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता. २३ मे रोजी विजय बैसला यांनी पिलूपुरा येथील ‘शहीद स्थळा’वरून महापंचायतीची घोषणा केली, हे ठिकाण २००८ मधील गुर्जर समुदायाच्या आंदोलनाचे केंद्र राहिलेले आहे, जिथे गुर्जर आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला होता आणि त्यात अनेकजण ठार झाले होते.

गुर्जर समाज भाजपा सरकारविरोधात आक्रमक
गुर्जर नेते सध्या महापंचायतीसाठी समाजात एकजूट निर्माण करण्याच्या उद्देशाने मोठ्या आणि लहान अशा अनेक सभा घेत आहेत. आंदोलकांचा मुख्य आक्षेप आरक्षणातील रोस्टर प्रणाली संदर्भात आहे. सध्या राजस्थानमध्ये एकूण ६४% आरक्षण आहे. त्यात इतर मागासवर्ग (OBC) २१ टक्के, अनुसूचित जाती (SC) १६ टक्के, अनुसूचित जमाती (ST) १२ टक्के, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) १० टक्के आणि अत्यंत मागासवर्ग (MBC) ५ टक्के आरक्षणाचा समावेश आहे. गुर्जर समाजाला मागील काँग्रेस सरकारच्या (अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील) कारकिर्दीत अत्यंत मागासवर्गात समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचा आरोप आहे की, या प्रणालीअंतर्गत संपूर्ण समाजाला आरक्षणाचा फायदा मिळत नाही.