मनसेची पुन्हा खळखट्याक, भाजपाला पुन्हा इशारा

मनसेची पुन्हा खळखट्याक, भाजपाला पुन्हा इशारा
-म्यान तलवार पुन्हा उपसल्याची चर्चा

प्रतिनिधी
पुणे : मनसे पदाधिकाऱ्यांच्या टोल नाक्यावरील राड्याप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी टोल प्रशासन आणि भाजप नेत्यांवर चौफेर टीका केली. “अमित ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करतोय, तो टोलनाके फोडत चाललेला नाहीये. एका टोल नाक्यावर हा प्रसंग घडला. त्याच्या गाडीला फास्टटॅग असूनही त्याला टोल नाक्यावर अडवलं गेलं. नंतर फोनाफोनी झाली. टोलनाक्यावरील माणसाची वॉकी टॉकी सुरु होती. समोरचा माणूस काहीतरी उद्धटपणे बोलत होता. या सगळ्यावर आलेली ती रिअॅक्शन होती…. या सगळ्या प्रकरणावर भाजपने बोलण्यापेक्षा टोलनाका मुक्त महाराष्ट्र करु, या त्यांच्या घोषणेचं काय झालं? ते त्यांनी सांगावं”, असं आव्हान राज ठाकरे यांनी दिलं. आयआरबीचे म्हैसकर कुणाचे लाडके आहेत? त्यांनाच प्रत्येक वेळी कसे टोल मिळतात? अशी विचारणाही राज यांनी केली. राज यांच्या आक्रमक भूमिकेने भाजपविरोधात म्यान केलेली तलवार त्यांनी पुन्हा उपसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले आहेत. मनसे पुणे विभाग प्रमुखांची राज ठाकरे आज बैठक घेणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जातोय. पुणे शहर कार्यकारणीत ते मोठे बदल करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बनवला गेला तेव्हा त्याच्यावरती फेन्सिंग टाकली गेली, मात्र समृद्धी महामार्ग बनवला गेला, तेव्हा त्यावर अशा प्रकारची कोणतीही फेन्सिंग टाकण्यात आलेली नाही. समृद्धीवर आतापर्यंत अपघातात ४०० लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत. याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का? फेन्सिंग न लावता सगळा समृद्धी महामार्ग पूर्ण मोकळा केलात, त्याच्यामुळे जनावरे, हरीण, कुत्रे थेट महामार्गावर येतात. त्याच्यामुळे अपघात वाढतायेत. मग या अपघाताला जबाबदार कोण? ही सरकारची जबाबदारी नाही का? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला. महामार्गावर अपघात होऊ नयेत म्हणून कोणत्याही खरबदारीच्या उपाययोजना केल्या नाहीत. मात्र त्याआधी टोल बसवले. रस्ता बनवला की लगेच टोल पाहिजे, असं फटकेबाजी करत राज यांनी पुन्हा ‘टोल’विरोधी सूर आळवला.