प्रचंड धाकधूक : नागपुरातील या १७ नगरपालिकांमध्ये आरक्षण ५० टक्क्यावर
-५७ नगरपालिकांमध्ये अतिरिक्त आरक्षण
प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील स्थानिक संस्थामध्ये इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू असलेल्या ५७ नगरपालिकांमध्ये सर्वाधिक १७ पालिका या नागपूर जिल्ह्यातील आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग- ओेबीसींसाठी सरसकट २७ टक्के आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. त्यामध्ये १७ जिल्हा परिषदा, ८३ पंचायत समित्या, नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका तसेच ५७ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची बाब समोर आली आहे. आदिवासीबहुल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
नंदूरबार जिल्हा परिषदेमध्ये एकूण आरक्षण १०० टक्के झाले आहे. पालघरमध्ये ९३ टक्के, गडचिरोली ७८ टक्के, धुळे ७३ टक्के, नाशिक ७२ टक्के आरक्षण लागू झाले आहे. अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला जिल्हा परिषदांमध्ये ६० ते ७० टक्के दरम्यान आरक्षण लागू झाले आहे. नागपूर, ठाणे, वाशिम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा आणि बुलढाणा या जिल्हा परिषदांमध्ये ५१ ते ६० टक्के दरम्यान आरक्षण दिले आहे.
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी, दिगडोह (देवी), कामठी, काटोल, खापा, उमरेड, कन्हान- पिंपरी, वाडी अशा ८ नगरपालिका आणि बेसा- पिपला, भिवापूर, बिडगाव- तारोडी(खुर्द), गोधणी(रेल्वे), कांद्री(कन्हान), महादुला, मौदा, नीलडोह, येरखेडा अशा ९ नगरपंचायतीमध्ये ५० टक्के पेक्षा अधिक आरक्षण लागू आहे.
–अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, दर्यापूर या नगरपालिका तर धारणी नगरपंचायतीमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्ल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपूरी, चिमूर, घुग्गूस, नागभीड, राजूरा अशा ७ नगरपालिका आणि भिशी नगरपंचायत.
– नाशिक जिल्ह्यातील मनमाड, पिंपळगाव-बसंवत, इगतपुरी, ओझर, त्र्यंबकेश्वर या नगरपालिका, यवतमाळमधील अर्णी, यवतमाळ या नगरपालिका तर धानकी नगरपंचायत.
– गडचिरोली जिल्ह्यात आरमोळी, देसाईगंज, गडचिरोली नगरपालिका, नांदेड जिल्ह्यातील भिलोली, धर्माबाद, कुंडलवाडी, उमरी तर पालघर जिल्ह्यातील जव्हार नगरपालिका आणि वाडा नगरपंचायत. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, भंडारामधील साकोली- सेंदूरवाफा, वर्धामधील पुलगाव.
– अहिल्यानगरमधील शिर्डी, पुण्यातील दौंड, नंदूरबारमधील नवापूर, तळोदा तसेच गोंदियामध्ये गोरेगाव नगरपालिका आणि सालेकासा नगरपंचायतीमध्ये ५० टक्केहून अधिक आरक्षण. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगरपालिका आणि सिंदखेड नगरपंचायतीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू आहे.
–३०० सदस्य ठरले होते अपात्र
आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या ५७ नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल याचिकेच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असतील, असे खंडपीठाने स्पष्ट केले. यापूर्वी २०२१ मध्ये धुळे, नंदुरबार, वाशिम, अकोला अशा काही जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षणावर निवडून आलेल्या २८९ सदस्यांचे नगरसेवकपद सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाले होते. या पार्श्वभूमीवर ५७ नगरपालिकांमधील ओबीसी प्रवर्गातून निवडून येणाऱ्या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार राहू शकेल.


