प्रकाश आंबेडकरांच्या या विधानाने वाढले महाविकास आघाडीचे टेन्शन
-स्पष्ट म्हणाले, आघाडीच्या कार्यक्रमांना जाऊ नका
प्रतिनिधी
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चाच सुरू आहे. या जागा वाटपाचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. जागा वाटपाचा फॉर्म्युलाही समोर आलेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर प्रचंड नाराज झाले आहेत. या नाराजीतूनच त्यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांनी आघाडीच्या कार्यक्रमांना, बैठकांना जाऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आंबेडकर यांच्या या विधानाने आघाडीचं टेन्शन वाढलं असून आता आघाडीच्या नेत्यांनी सारवासारव सुरू केली आहे.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून हे आवाहन केलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पुढील सूचना येईपर्यंत कोणीही आघाडीच्या बैठका आणि कार्यक्रमाला हजर राहू नये, असं वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी म्हटलं आहे.


