नागपूर जि. प. च्या मिनी मंत्र्यांचा आज फैसला

नागपूर जि. प. च्या मिनी मंत्र्यांचा आज फैसला
-चार विषय समिती सभापतीसाठी निवडणूक
प्रतिनिधी
नागपूर : जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे सभापतिपद एकाअर्थी मिनी मंत्री म्हणून ओळखले जाते. उद्या, मंगळवारी(१ नोव्हेंबर) कै. आबासाहेब खेडकर सभागृहात हि निवड प्रक्रिया आयोजित आहे. यासाठी भाजपाची भूमिका अस्पष्ट असल्याने महाविकास आघाडीची पूर्णत: सत्ता राहील, असा शतप्रतिशत दावा आहे. ही पदे मिळविण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये प्रचंड लॉबिंग सुरु आहे.

उद्या, सकाळी ११ वाजता सर्व पत्ते उघडल्या जाणार आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार सभापती, असे एकुण सहा पद आहेत. विधानसभा मतदार संघानिहाय पद देण्याचे निश्चित असल्याचे सूत्रांकडून समजते. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून सावनेर व हिंगणा तालुक्याला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. त्यामुळे चार सभापती पद उर्वरित मतदार संघाला जाण्यार असल्याचे सांगण्यात येते. हिंगणा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एका पदासाठी दावा करण्यात येत आहे. कामठी मतदार संघातून अवंतिका लेकुरवाळे, दिनेश ढोले यांच्या नावाची चर्चा आहे. अवंतिका लेकुरवाळे या सत्ता पक्षनेत्या आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील घटनेसाठी त्यांच्याकडे बोट आले होते. तर रामटेक मतदार संघात दुधाराम सव्वालाखे व शांता कुमरे यांच्यात चुरस आहे. कुमरेंचे नाव अध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते. त्यांना एका समितीवर घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.

-तीन पुरुष व तीन महिला सदस्यांची नियुक्ती
तीन पुरुष व तीन महिला सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी सदस्यांची आहे. अशा परिस्थितीत कुमरे यांची वर्णी लागल्यास लेकुरवाळेंचा पत्ता कटू शकतो. तर लेकुरवाळेंची वर्णी लागल्यास कुमरेंचा पत्ता कटण्याची शक्यता आहे. कुमरे यांना समाजकल्याण समिती दिल्यास चार महिला पदावर महिला सभापती होतील. त्यामुळे आता फक्त महिला व बाल कल्याण समितीला महिला द्या, उर्वरित तीन ठिकाणी पुरुष सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरू लागत आहे. कुमरे यांना संधी मिळाल्यास सव्वालाखे यांचा पत्ता कटणार आहे. याशिवाय, लेकुरवाळे यांचीही संधी हुकेल, असे राजकीय जाणकार सांगतात. उमरेडमधून अरुण हटवार व मिलिंद सुटे दावेदार असल्याची चर्चा आहे. हटवार यांनी यापूर्व उपाध्यक्षपदासाठी दावा केला होता. संजय जगताप, सुनीता ठाकरे, योगेश देशमुख हेसुद्धा पदासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येते.

-मंगळवारी सकाळी भाजपची बैठक
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस फुटली होती. परंतु , यावेळी सर्व बंडखोर सदस्यांना घरवापसी केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांचा आहे. नाना कंभाले यांनीही फार्म हाऊसवर जाऊन सदस्यांशी भेट घेतली. परंतु, निवडणुकीच्या दिवशी भूमिका स्पष्ट करणार असल्याने कंभाले यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या वेळी मिळालेल्या संख्ये पेक्षा यावेळी कमी मत मिळण्याचा धोका आहे. त्यामुळे निवडणूक लढण्याचे मत काहींचे आहे. मंगळवारला सकाळी भाजपची बैठक होणार आहे. यात निवडणुकीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-राष्ट्रवादीच्या बठकीकडे सदस्यांची पाठ
राष्ट्रवादी कॉंग्रेसने दोनची मागणी सोडत एका पदाची तयारी केली. परंतु, या एका पदासाठी बंग आणि देशमुख गटात रस्सीखेच सुरू आहे. बंग गटाकडून दिनेश बंग तर देशमुख गटाकडून बाळू जोध व सलील देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. बंग व देशमुख गटाचा एकमेकांना विरोध आहे. माहितीनुसार, गट नेते दिनेश बंग यांनी निवडणुकीबाबत सदस्यांची बैठक बोलावली होती. परंतु, बैठकीला सर्वांनीच पाठ दाखविल्याची माहिती आहे. परंतु, राष्ट्रवादीचा कुठलाही नेता बोलायला तयार नाही.