- नागपुरात का केली पटोलेंनी फडणवीसांवर जिव्हारी टीका ?
-आम्ही थेट त्यांच्या नाकातला केस काढला
गजानन ढाकुलकर
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच राज्यातील सत्तांतरावर बोलताना “आम्ही त्यांच्या (उद्धव ठाकरे) नाकाखालून सरकार नेले आणि ते काहीही करू शकले नाहीत,’ असे वक्तव्य केले होते. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांचा पराभव झाला. त्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी म्हटले की, ‘त्यांनी आमच्या नाकाखालून सरकार नेले, तर आम्ही थेट त्यांच्या नाकातला केस काढला,’ असे प्रत्युत्तर देत फडणवीसांवर टीका केली. नेत्यांसोबत काय बोलले जाते त्याबाबत मी काही बोलणार नाही. या यशाचे श्रेय महाविकास आघाडीच्या एकोप्याला जाते. आम्हाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे भाजपच्या पोटात चांगलेच दुखले, असेही ते म्हणाले.
विदर्भात नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर पटोले प्रथमच नागपुरात आले होते, तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. याबाबत विचारले असता, नाना पटोले यांनी सर्वप्रथम बाळासाहेबांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या. अधिक काही बोलले नाही.
१५ फेब्रुवारीला बैठक गेल्या महिन्यात नागपुरात आमची प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली होती. आता आमच्यासमोर पोटनिवडणुका आहेत, त्यासाठी धोरण आखायचे आहे आणि नवनिर्वाचित शिक्षक व पदवीधर आमदारांचाही सत्कार करायचा आहे. आम्ही कार्यकारिणीची बैठक येत्या १५ फेब्रुवारीला ठेवलेली आहे. पक्षाच्या पातळीवर या सर्व गोष्टींची चर्चा केली जाईल.’


