थेट राहुल गांधींशी बोलू, शिवसेना-वंचित युतीचा मविआत समावेश
-नाना पटोले म्हणाले होते, वंचितचा संबंध नाही
प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना-वंचित युतीचा महाविकास आघाडीशी कोणताही संबंध नाही, असे वक्तव्य करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मविआत सर्व आलबेल नसल्याचे संकेत दिले. त्यावर वंचितचा मविआत समावेश करण्याबाबत आम्ही थेट राहुल गांधींशी बोलू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
वंचितबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आला नाही, असे नाना पटोले म्हणाले होते. त्यावर आज पत्रकार परिषदेत नाना पटोले यांचा उल्लेखही न करता संजय राऊत म्हणाले, याबाबत आम्ही राहुल गांधींशी चर्चा करू. राहुल गांधी याबाबत सकारात्मक असतील.
–वंचितवरून नाना पटोलेंचा मतभेद
राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वंचित बहूजन आघाडीवरुन एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार हे भाजपचेच असल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. त्यामुळे वंचितला मविआत सामावून घेण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कितपत तयार होतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना शरद पवारांवरील वक्तव्यावरुन पुन्हा सुनावले. संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे देश तसेच राज्याच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे शरद पवारांविषयी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून वापरावेत. त्यांचे हे वक्तव्य आम्हाला मान्य नाही. मविआ नेत्यांबद्दल बोलतानाही प्रकाश आंबेडकर यांनी सांभाळून बोलावे.
–शरद पवार हे भाजपचे आहे म्हणणे चुकीचे
संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे भाजपचे आहे असे म्हणणे हा शरद पवारांच्या कारकिर्दीतील मोठा आरोप आहेत. शरद पवार हे भाजपचे असते तर त्यांनी अडीच वर्षांपूर्वी राज्यातील भाजप सरकारला दूर ठेऊन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले नसते. शरद पवार यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला.
–मतभेद दूर ठेवायला पाहिजे
संजय राऊत म्हणाले, आजही भाजपविरोधात विरोधकांच्या एकीचा विषय निघाला की शरद पवार यांचे नाव समोर येते. त्यामुळे शरद पवारांबद्दल प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून वापरायला हवेत. सध्या केवळ शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीची युती झाली आहे. भविष्यात आम्हाला एकत्र काम करायचे आहे. त्यामुळे भुतकाळातलेल मतभेद दूर ठेवायला पाहीजे, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.
–चिंचवडची जागा शिवसेनेलाच हवी
पुणे पोटनिवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. चिंचवडमधील जनतेचाही आम्हाला पाठिंबा आहे. मातोश्रीवर अजित पवार यांना आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे कळवली आहे. केवळ कसब्याच्या जागेसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निर्णय घ्यायचा आहे.


