तटकरे यांनी सांगितले, २०१४ ला भाजपाला पाठिंबा देण्याचे कारण

तटकरे यांनी सांगितले, २०१४ ला भाजपाला पाठिंबा देण्याचे कारण

-अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदावरूनही भाष्य

प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्राच्या जनतेची आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की अजितदादा मुख्यमंत्री व्हावे. पूर्वी एकदा संधी आली होती. मात्र, आम्ही ते संधी घालवली. आम्ही आता एकत्र आलो आहोत. राज्यात पुन्हा सत्तेत महायुती म्हणून येणं हे आव्हान आहे. मंत्री दीपक केसरकर म्हणाले की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्या जातील आणि त्यात यश मिळेल. ते अगदी योग्य बोलले आहेत. एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही निवडणूक एकत्रित लढणार आहोत, असे राष्ट्रवादीचे (अजितदादा गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

– न मागताही दिला पाठिंबा

नागपूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रवादीची सगळी घोडदौड आम्ही बघितली आहे. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. त्यांच्या मोठ्या प्रमाणात जागा आल्या. मात्र, मुख्यमंत्री पदावरून त्यांच्यात वाद झाला आणि राजकारण बदललं. 2019 मध्ये निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली. 2014 मध्ये सुद्धा भाजपने न मागताही आम्ही पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता सामुदायिक निर्णय घेत सगळ्यांनी सत्तेत भाजपसोबत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असे तटकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

–जागावाटप संदर्भात लवकर निर्णय

संघटनेचे पदाधिकारी यांच्या अशा भावना आहेत की त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या कानावर ही बाब घातली आहे. राष्ट्रवादीची एकही जागा विदर्भात नाही. आताही 6 आमदार निवडून आले आहेत. जागावाटप संदर्भात लवकर निर्णय होईल. लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या जागा निश्चित झाल्यावर त्या निवडून येणे यावर लक्ष दिले पाहिजे असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारची भूमिका स्वच्छ आहे. सरकारची विनंती जरांगे पाटील यांनी मान्य केली. सरकार त्यांच्या भूमिकेनुसार आरक्षण देण्यासाठी पावलं उचलत आहे. एसटी कामगारांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होते. ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न होत आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी काही नव्याने भूमिका मांडली असेल. परंतु, राज्य सरकार सर्वच घटकांना न्याय देण्याचा काम करत आहे असे तटकरे म्हणाले.