चांगली बातमी ! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

चांगली बातमी ! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार
-शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

प्रतिनिधी
मुंबईः राज्याला प्रतीक्षा लागलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी येत्या काही तासात धडकण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या आमदारानेच हा दावा केलाय. बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी यासंबंधीचे सूतोवाच केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत आज पक्षश्रेष्ठींसोबत बैठक पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लगेच येईल, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलंय.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारासाठी अनेक आमदार इच्छुक आहे. सगळ्यांनाच वाटतंय, मंत्रिपदाचा विस्तार झाला पाहिजे. त्यासाठीच राज्याचे दोन्ही नेते दिल्लीला रवाना झालेले आहेत. मी काही मंत्रीपदाची मागणी केली नाहीये पण लवकरात लवकर मंत्रिपद विस्ताराचा निर्णय होईल अशी चर्चा आहे.. आजची जर बैठक झाली तर लगेच निर्णय होईल, असा दावा संजय गायकवाड यांनी केलाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप करताना संजय गायकवाड म्हणाले, ‘ मला दगड धोंड गृहीत समजून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या चिखलात यांनी टाकलं होतं. त्या चिखलातून झेप घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि आता नैसर्गिक युतीसोबत आम्ही काम करत आहे.

-विधानभवनातील तैलचित्र हा दांभिकपणा

बाळासाहेब ठाकरेंचे विधानभवनातील तैलचित्र हा दांभिकपणा असल्याची टीका उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरु आहे. हिंमत असेल तर तुमच्या वडिलांच्या नावावर निवडणूक लढवा, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नका, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलंय. त्यावर संजय गायकवाड म्हणाले. साहेब ही कुणाची प्रायव्हेट मालवत्ता नाहीये. राष्ट्रपुरुष सगळ्यांचे असतात. त्यांचा फोटो आणि कार्यक्रम सादर करण्याचे अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहेत. वैयक्तिक कुणी हक्क सांगू शकत नाही. मोदींची आम्ही माणसं आहोत तर शिवसेना भाजप म्हणून आम्ही एकमेकांची माणसं आहोत, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलंय.

-आम्ही आमदार बाळासाहेबांचा विचार घेऊन

1992 ला 18 आमदार फुटले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी आमदार गेले, असा शब्द वापरला होता. परंतु, ते आमदार बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडून सत्तेच्या लालच्या पोटी तिथे गेले होते. आम्ही आमदार बाळासाहेबांचा विचार घेऊन हिंदुत्वाचा विचार घेऊन बाहेर पडलो. त्यामुळे त्यांनाच तुडवण्याची गरज आहे, असे प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिले.