कारण काय?; शिवशक्ती-भीमशक्तीच्या प्रयाेगाला खीळ!
-आंबेडकरांचे वक्तव्य बाधक ठरण्याची श्यकता
प्रतिनिधी
नागपूर : तीन पक्षांच्या महाविकास आघाडीबराेबर नुकतेच नाते जोडलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने आघाडीत बिघाडीची शक्यता आहे. पवार यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून प्रकाश आंबेडकर यांना शिवसेना व राष्ट्रवादीने सुनावले आहे. या पार्श्वभूमीवर शिवशक्ती-भीमशक्तीच्या प्रयाेगाला खीळ बसण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाशी युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याच्या दृष्टीने पावले पडतील अशी अपेक्षा होती, परंतु ‘शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल,’ असे वक्तव्य आंबेडकर यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंबेडकर यांच्या या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. याशिवाय ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आंबेडकरांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला आहे.
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी अशी वक्तव्ये करणे योग्य नाही. देशात भाजपविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जात असताना त्याचे स्तंभ शरद पवार आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याविषयी आदर ठेवून बोलले पाहिजे,’ असे संजय राऊत यांनी म्हटले. ‘शरद पवार यांच्याबद्दल कोणी काही बोलत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही,’ असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे.
संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकर सारवासारव करतील अशी अपेक्षा होती. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या लेखी संजय राऊत महत्त्वाचे नसल्याचे दाखवून दिले. ‘हा सल्ला मला उद्धव ठाकरे यांनी दिला असता तर तो मी नक्की मानला असता,’ असे प्रत्युत्तर देत आंबेडकर यांनी राऊतांच्या सल्ल्याला केराची टोपली दाखवली आहे. तसेच ‘वंचित महाविकास आघाडीत सहभागी झाल्यास सामूहिक नेतृत्व असेल,’ असे एकतर्फी स्पष्ट करत आंबेडकरांनी धमाल उडवून दिली.
एकूण, वंचितच्या भूमिकेने महाविकास आघाडीतील बेकी चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेला वंचित बहुजन आघाडीसंदर्भात काय सल्ला देतात याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, मात्र जेष्ठ नेते शरद पवार यांनी अद्याप आपले मत व्यक्त केले नाही. ते काय भुमिका घेतली हे पाहणे रंजक ठरले. आंबेडकर सतत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टिका करतात.
प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्याशी युती झाली असून महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. आंबेडकर यांची महाविकास आघाडीतील एन्ट्री केवळ मनघडत कहाणी आहे, असा पवित्रा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला.
ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील वंचितचा प्रवेश आता कठीण झाला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला आपल्यातील वाटा वंचितला सोडावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


