काय सांगता ? नागपूर जि. प. त एका मिनिटात 27 विषय मंजूर
– भाजपा सदस्यांसह काँग्रेस बंडखोरांचा आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी
नागपूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नवनियुक्त अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी सभागृहात विषय चर्चेला न घेताच विषयसूचीवरील 27 विषयांना मंजुरी दिली, असा आरोप विरोधीपक्ष भाजपा सदस्यांसह काँग्रेस बंडखोरांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. पाच डिसेंबरला झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा रद्द करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी म्हटले की, मुक्ता कोकड्डे यांनी विषयसूचींवरील विषयांचे वाचन करायला हवे होते. मात्र, त्यांनी एककल्ली काम करत एक ते दहा विषय मंजूर करत सभा संपवली. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. त्या ग्रामपंचायतींच्या अखत्यारितील कामांना मंजुरी देणे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. अशा अनेक कामांना मंजुरी दिली आहे. अध्यक्षा अनेक कामे नियमबाह्य करत आहेत. त्यांच्यावर जिल्हा परिषद संहिता आणि लोकसेवक अधिनियमानुसार कार्यवाही करावी तसेच या सर्वसाधारण सभेतील सर्व विषय रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. निवेदनावर उपनेते व्यंकट कारेमोरे, सतीश डोंगरे, सुभाष गुजरकर, नाना कंभाले, संजय झंडे, राधा अग्रवाल, मीनाक्षी सरोदे, नीता वलके, पुष्पा चाफले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-उपाध्यक्षांचे बोखारा टार्गेटवर
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष यांच्या मतदारसंघातील बोखारा येथे शिवटेकडी मंदिराच्या बांधकामाच्या एक कोटी 35 लाख 35 हजार 270 रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. याठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक असतानाही कामांना मंजुरी मिळत आहे. अशाप्रकारच्या अनेक प्रशासकीय मान्यतांचे विषय तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे याबाबत तक्रार करण्यात आलेली आहे.


