काय आहे प्रकरण:बावनकुळेविरोधात राष्ट्रवादी गेली पोलिसात
-पवार यांनी जादुटोणा केल्याचे वक्तव्य
प्रतिनिधी
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कल्याण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला, या वक्तव्याविरोधात ही तक्रार आहे.
पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी स्वतः उपस्थित रहात पुराव्याची एक सीडीही यावेळी दिली. आता पोलिस काय कारवाई करणार, याची उत्सुकता आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काल, शुक्रवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जादूटोणा करण्यात आला. त्या जादूटोण्यात उद्धवजी चालले गेले. हा जादूटोणा राष्ट्रवादीकडून करण्यात आला. ठाकरेंचे विचार त्यामुळेच बदलले आणि त्यांनी युतीचे दरवाजे बंद करत पवारांकडे गेले. शरद पवारांच्या ताब्यात जाणारा सुटत नाही हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे, असा दावा त्यांनी केला. याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
-पक्ष प्रदेशाध्यक्षांनी बोलणे चुकीचे
महेश तपासे म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला. त्यामुळे ते महाविकास आघाडीत गेले, असा आरोप केला. वास्तविक शरद पवारांच्या आशीर्वादाने आमच्या आघाडी सरकारने जादूटाणा विरोधी कायदा 2013 मध्ये संमत केला. त्या कायद्याचे भाजप, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले. ज्या कायद्याचे भाजपच्या दोन प्रदेशाध्यक्षांनी समर्थन केले. त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी असे बोलणे चुकीचे आहे.
तपासे पुढे म्हणाले की, जादूटोणा विरोधी कायदा आमच्या मागील सरकारने केला. आता चंद्रशेखर बावनकुळे त्या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करत असतील, तर ते पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ते दुर्दैवी आहे. त्या संदर्भात मी तक्रार केली. कायद्याचे उल्लंघन असेल, तर कायदा त्याचे काम करेल.


