कांथा खतरनाक निकला :  गडकरी यांना धमकी देणाऱ्याचे संबंध दाऊद गँगसोबत

कांथा खतरनाक निकला :  गडकरी यांना धमकी देणाऱ्याचे संबंध दाऊद गँगसोबत

-तपासातून धक्कादायक माहिती उघड

प्रतिनिधी
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बेळगाव कारागृहातून दोनदा फोनवर धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याचे संबंध बंदी घातलेल्या संघटना पीएफआय, लष्कर-ए-तोयबा, दाऊद इब्राहिम टोळीच्या लोकांसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी धक्कादायक माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

तपासातून समोर आलेल्या या धक्कादायक माहितीमुळे जयेश पुजारीविरोधात नागपूर पोलिसांनी यूएपीए (अनलॉफुल अ‌ॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अ‌ॅक्ट) लावल्याची माहितीही अमितेश कुमार यांनी दिली. अमितेश कुमार यांनी सांगितले की, जयेश पुजारीविरोधात यूएपीए अ‌ॅक्टचे कलम 10, 13, 18 आणि 20 लावण्यात आले आहे. एसीपी निलेश पालवे या प्रकरणाचा तपास करीत आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय आणि राज्याच्या तपास यंत्रणांशी समन्वय ठेवून केला जात आहे.

14 एप्रिलपर्यंत नागपूरच्या पोलीस कोठडीत

जयेश पुजारी उर्फ जयेश कांथाची पोलिस कोठडी 14 एप्रिलपर्यंत नागपूर पोलिसांकडे आहे. त्यानंतर काय करायचे? याचा निर्णय नंतर घेऊ. तपास सध्या प्राथमिक स्तरावर आहे. काही संवेदनशील आणि खळबळजनक माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक काही सांगता येणार नाही, असे आयुक्तांनी सांगितले.

-खंडणीची सातत्याने मागणी

जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याने आधी नितीन गडकरींना फोन करून पहिल्यांदा 100 कोटींची तर दुसऱ्यांदा 10 कोटींची मागणी केली होती. 28 मार्चपासून जयेश पुजारी नागपूर पोलिसांच्या कोठडीत आहे. नागपूर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी नागपुरात आणले आहे. बेळगाव कारागृहातून जयेश पुजारीने नितीन गडकरींना धमकीचा फोन केला होता.

तुरुंगात तरीही राहायचा ऍक्टिव्ह

नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहातून जयेश पुजारीच्या बॅरेकमधून दोन सिम आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून कांथा तुरूंगात होता. तिथेही त्याच्या अ‌ॅक्टिव्हिटी सुरू होत्या. तुरूंगात येण्यापूर्वीपासून त्याचे काही विघातक लोकांशी संबंध होते. तुरूंगात आल्यानंतर इतरांशी त्याचा संबंध आला. कांथा निश्चितच काही विघातक कारवायांमध्ये गुंतलेला होता, असे म्हणता येऊ शकते. त्याची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी आम्ही करू, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.